कांदळवनाची तोड करीत बेकायदा बांधकामे सुरूच

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील ऐतिहासिक वारसा असलेल्या घोडबंदर गावाला पुराचा धोका वाढला आहे. येथील खाडी आणि नैसर्गिक परिसर नष्ट करण्याचे काम सुरूच आहे. कांदळवनाची तोड करीत बेकायदा बांधकामे उभारण्यात येत असल्याने हा धोका वाढला आहे. या प्रकरणी प्रशासन मात्र वरिष्ठांकडे अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगत कारवाईस टाळाटाळ करीत आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गाला लागूनच घोडबंदर हे किनाऱ्याजवळ वसलेले गाव आहे. या घोडबंदर खाडीतून मीरा रोड व काशिमीरा भागातील पावसाचे पाणी व सांडपाणी वाहून जाण्याचा मुख्य मार्ग आहे. परंतु ही खाडी आणि नैसर्गिक परिसर नष्ट करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. खाडीकिनारा व पात्रात कचरा, बांधकामाचे साहित्य आदींचा भराव केला जात असून कांदळवनांची तोड करीत बांधकामे केली जात आहेत. यामुळे भविष्यात शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. किनाऱ्यालगत होत असलेल्या या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे राज्य शासनाचे आदेश असतानाही याकडे दुर्लक्ष होत आहे. या बांधकामांवर तोडक कारवाई करून गुन्हे दाखल करण्याऐवजी या बांधकामांना वीजपुरवठा, नळजोडणी, कर आकारणी आदी सुविधा पुरविल्या जात आहेत. परिसरातील मोठमोठी कांदळवनाची झाडे तोडण्यात आली असून बेकायदेशीर बांध व भराव घालून भरतीचे पाणी अडविले जात आहे. खाडीतील सांडपाण्यावर भाजीपाला लावण्यात येत आहे.

घोडबंदर परिसरात तहसीलदार आणि तक्रारदार यांची पाहणी पूर्ण झाली आहे. कांदळवन समितीत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा समावेश असतो. त्यामुळे आता सर्व अधिकाऱ्यांकडून पाहणी करून तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे.

– नंदकुमार देशमुख,नायब तहसीलदार