मुंबई-गोवा महामार्गावर पालीजवळील खानू गावाजवळ गुरूवारी सकाळी झालेल्या भीषण कार अपघातात सात जण जागीच ठार झाले, तर एक जण जखमी झाला. जखमीला जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून कार झाडाला धडकल्याने हा भीषण अपघात झाला असून हे सर्व अपघातग्रस्त मुंबईचे आहेत.

सचिन सावंत, प्रशांत गुरव, अक्षय केरकर (चालक) निहाल कोटीयन, केदार तोडणकर, वैभव मनवे आणि मयूर बेलणेकर (सर्व जण २५ ते ३५ वयोगटातील) अशी मृत तरूणांची नावे आहेत. अपघातात अभिषेक कांबळी हा तरूण बचावला. हे सर्वजण मुंबईतील विलेपार्ले आणि मालाड परिसरातील आहेत.

बुधवारी मध्यरात्री हे तरूण झायलो गाडीने मुंबईहून गोव्याला निघाले होते. मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबापासून सुमारे १२ किलोमीटरवर खानू गावाजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी विरूध्द दिशेला रस्त्याकडेच्या फणसाच्या झाडावर आदळून उलटली आणि १० ते १२ फूट खोल खड्डयात कोसळली. या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला. स्थानिक ग्रामस्थ तत्काळ मदतीला धावले. क्रेनच्या साहाय्याने गाडी खड्डयातून बाहेर काढून गॅसकटरने गाडीचा पत्रा कापून या तरूणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

या अपघातात चालकाशेजारी बसलेला अभिषेक कांबळी हा तरूण बचावला. त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील तरूणांचे मृतदेह संध्याकाळी उशिरा त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. रात्रभराच्या प्रवासामुळे थकलेल्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला.