28 February 2021

News Flash

खड्डय़ांमुळे ‘अपघातांचे चौक’

कल्याण-बदलापूर रस्त्यावर ठिकठिकाणी अपघातांची शक्यता वाढली

कल्याण-बदलापूर रस्त्यावर ठिकठिकाणी अपघातांची शक्यता वाढली

कल्याण-बदलापूर दरम्यानच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या रस्त्याची रखडपट्टी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यात पहिल्या पावसानंतर १५ किलोमीटरच्या या रस्त्यातील विविध चौक खड्डय़ात गेले आहेत. त्यामुळे भर पावसात वाहनचालकांना या अनपेक्षित खड्डय़ांचा सामना करावा लागतो आहे. या खड्डय़ांमुळे अपघाताची शक्यताही वाढली आहे.

पालघर जिल्ह्य़ाच्या जव्हार या टोकापासून ते रायगडच्या खोपोलीपर्यंतच्या १५६ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग ४८ चा बराचसा भाग कल्याण ते बदलापूरमधून जातो. अवघ्या १५ किलोमीटरच्या या रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरणाचे काम एमएमआरडीएकडून गेल्या अनेक वर्षांपासून हाती घेण्यात आले आहे. मात्र अतिक्रमण हटविण्यात तसेच वेळीच निधी उपलब्ध करण्यात अडचणी आल्याने हे काम रखडले.

त्यामुळे गर्दीच्या १५ किलोमीटरच्या या भागात गेल्या काही वर्र्षांत अनेक अपघात झाले. त्यात अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. या काळात या रस्त्याच्या विविध चौकात मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडल्याने वाहतूक मंदावली आहे. कल्याणपासून उल्हासनगर, अंबरनाथमार्गे बदलापूरला जाणाऱ्या या रस्त्यात सर्वच चौक वर्दळीचे आहेत. मात्र मोठमोठय़ा खड्डय़ांमुळे अंबरनाथचा फॉरेस्ट नाका, लादी नाका, शास्त्री विद्यालयाजवळील चौक, उल्हासनगरचा फॉरवर लाइन चौक, शिवाजी चौक, काजल पेट्रोल पंपाजवळील चौक येथे मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसात त्यात पाणी साठल्याने हे खड्डे दिसून येत नाहीत. त्याच वेळी बहुतेक भागात पथदिवेही नसल्याने अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे जीवितहानी झाली नसली तरी अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वेळीच हे खड्डे भरण्यात यावेत अशी मागणी होत आहे. दरम्यान, गेल्या तीन ते चार वर्षांत या रस्त्यावरील असमानता, दोन रस्त्यातील निखळलेले पेव्हर ब्लॉक आणि खड्डय़ांमुळे दहाहून अधिक जणांना प्राण गमवावे लागले आहेत. तसेच वाहनांची संख्याही वाढल्याने हा रस्ता कायम वर्दळीचा असतो. त्यामुळे मोठा अपघात होण्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

खर्चात वाढ

जुन्या निविदेत समाविष्ट नसलेल्या अनेक नव्या कामांचा समावेश करून नव्या निविदा तयार करण्यात आली आहे. त्यानुसार रस्त्याची किंमत आता ३५ कोटींवरून ४३ कोटींवर गेल्याची माहिती मिळते आहे. मात्र आचारसंहितेमुळे ही निविदा अडकली आहे. त्यानंतर रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण होईल, असे एमएमआरडीएच्या वतीने सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 1:27 am

Web Title: road accident in thane 3
Next Stories
1 डायलिसीस केंद्रातील ऑक्सिजन संपल्याने रुग्णाचा मृत्यू?
2 वसईत वनसंपदा!
3 जन्म, मृत्यू, विवाह झाल्यास एक झाड लावणे बंधनकारक
Just Now!
X