ठाकुर्ली रेल्वे स्थानकासाठी वळसा; नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात
ठाकुर्ली चोळेगाव हा भाग नव्याने विकसित होत असून येथील लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. येथील नागरिकांना रेल्वे स्थानक गाठण्यासाठी दोन रस्ते उपलब्ध आहेत. यातील एक रस्ता येथील एका वसाहतीने बंद केल्याने परिसरातील इतर नागरिकांची कोंडी झाली आहे. हा मार्ग बंद झाल्याने येथील नागरिकांना जुन्या हनुमान मंदिराकडून लांबचा वळसा घालून रेल्वे स्थानक गाठावे लागत असल्याने या नागरिकांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाकुर्ली परिसर नव्याने विकसित होत असून येथे टोलेजंग इमारती उभारण्यात येत आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने या भागात बंदिश पॅलेस हॉटेल ते ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्टेशन असा ९० फुटी मार्ग बांधला आहे. या भागातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी केवळ दोन रस्ते उपलब्ध आहेत. एक म्हणजे सवरेदय आशीष सोसायटी बिल्डिंग नं. १ ते ५मधून महिला समिती शाळेच्या भागातून औद्योगिक विभागाकडे जाणारा मार्ग तेथून ठाकुर्ली स्टेशन गाठता येते, तर दुसरा मार्ग म्हणजे ठाकुर्लीतील जुन्या हनुमान मंदिराकडून डावीकडे ठाकुर्ली-कल्याण रेल्वेमार्गालगत असलेला म्हसोबानगर, बालाजीनगरकडून येणारा रस्ता. सवरेदय आशीष सोसायटीच्या व्यवस्थापन सोसायटीने आपला मार्ग येथील रहिवाशांसाठी बंद केल्याने स्थानिक परिसरातील इतर स्थानिक नागरिकांची तसेच सोसायटीच्या ६ व ७ नंबर इमारतीतील रहिवाशांची कोंडी झाली आहे.
हा रस्ता रहदारीचा रस्ता असल्याचे येथील भूमिपुत्रांचे म्हणणे आहे. हा रस्ता सध्या सोसायटीच्या विकास आराखडय़ात सामील असल्याचे येथील वसाहतीमधील पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दुसऱ्या रस्त्याचा पर्याय येथील नागरिकांना उपलब्ध असून त्यांनी त्या मार्गाचा वापर करावा, असे सोसायटीने बजाविले असून, येथील नागरिकांनी या रस्त्याचा वापर करू नये म्हणून सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
आयुक्तांना निवेदन
दरम्यान, सोसायटीच्या म्हणण्याला विरोध करत विद्याधर रिसबूड, भास्कर सांबरे, सचिन शिंदे, टी.आर.के. मेनन यांनी यासंबंधी रामनगर पोलिसांकडे धाव घेतली आहे. तसेच आयुक्त ई. रवींद्रन यांनाही निवेदन दिले आहे. दुसऱ्या रस्त्याचा पर्याय असला तरी तो लांबचा मार्ग असल्याने वृद्ध, लहान मुले, रुग्णांना तसेच महिलांना याचा त्रास होतो. त्यामुळे येथील रहिवाशांनी आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला आहे.

खासगी मालकीचा रस्ता
याविषयी सवरेदय आशीष सोसायटीचे कार्यवाह विनेशन कुरुप म्हणाले, मुळात हा खासगी मालकीचा रस्ता आहे. काही तरुणांचे टोळके येथून भरधाव वेगाने मोटारसायकली चालवितात. यामुळे अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या मार्गाखेरीज नागरिकांना दुसऱ्या मार्गाचा पर्याय उपलब्ध असून त्यांनी त्या मार्गाचा वापर करावा. या मार्गावरून सोसायटीचे सदस्य सोडून इतरांना जाता येणार नाही. याविषयीचा प्रस्ताव सोसायटीने एकमताने मंजूर केला असल्याने इतरांना प्रवेश नसल्याचे स्पष्टीकरण कुरुप यांनी दिले आहे.