भाईंदर स्थानक परिसरात रस्त्यातच बेशिस्त पद्धतीने उभ्या असलेल्या रिक्षांचा परिणाम

भाईंदर पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ नेहमी होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून या परिसरात काही महिन्यांपूर्वीच रुंदीकरण करण्यात आले. आता तरी वाहतूक कोंडी होणार नाही, अशी वाहनचालकांना आशा होती. मात्र ही आशा फोल ठरली आहे, कारण स्थानक परिसरात सध्या काही रिक्षा बेकायदा उभ्या राहत असल्याने नागरिकांना पुन्हा वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.

भाईंदर पश्चिम रेल्वे स्थानक परिसर याआधी अत्यंत दाटीवाटीचा होता. याच भागात रिक्षा आणि बसस्थानक असल्याने कायम वाहतूक कोंडी होत असे. सकाळच्या वेळी तर प्रवाशांना अध्र्या रस्त्यातच उतरून स्थानक गाठावे लागत असे. मीरा-भाईंदर महापालिकेने गेल्या वर्षी भाईंदर पश्चिम आणि पूर्व यांना जोडणारा जेसल पार्क येथील भुयारी मार्ग सुरू केला. या मार्गामुळे भाईंदर पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात वाहनांची संख्या वाढून या ठिकाणी वाहतूक कोंडीत भर पडणार होती. यासाठी भुयारी मार्ग सुरू करण्याआधी महापालिकेने या परिसरात रस्ता रुंदीकरण केले. या ठिकाणी ग्रामपंचायत काळापासून असलेल्या एका हॉटेलचा काही भाग तोडण्यात आला तसेच नाक्यावरच असलेला बीयर बारही पूर्णपणे तोडण्यात आला. या भागात बसणाऱ्या फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यात आली. त्यामुळे हा भाग एकदम मोकळा झाला आणि वाहतूक कोंडीचा त्रास बऱ्यापैकी कमी झाला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी पुन्हा वाहतूक कोंडी जाणवू लागली आहे. या ठिकाणी असलेल्या रिक्षा स्थानकात भाईंदर पोलीस ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या आणि साठ फुटी रस्त्याकडे जाणाऱ्या रिक्षांची स्वतंत्र रांग लागते. आता यात आणखी एका रिक्षा स्थानकाची भर पडली आहे. या नव्या रिक्षा स्थानकात उभ्या राहणाऱ्या रिक्षा बेशिस्त रीतीने कशाही उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे इतर रिक्षांना तसेच येथून जाणाऱ्या बसेसना त्याचा अडथळा होत आहे आणि वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

दुभाजक बसवण्याची मागणी

या भागात रस्त्यात दुभाजक बसवण्यात यावा, अशी मागणी ‘रिक्षाचालक-मालक युनियन’ने महापालिकडे सातत्याने केली आहे, परंतु त्यांची मागणी मान्य करण्यात आलेली नाही. रस्त्यात दुभाजक बसवला तर रिक्षाचालकांना आपोआपच शिस्त लागेल, असे युनियनचे म्हणणे आहे. नव्याने तयार झालेला रिक्षा स्थानकही बेकायदा असून त्याला परवानगी नसल्याने तो या ठिकाणाहून तात्काळ हटवण्यात आला पाहिजे, अशी मागणी रिक्षाचालकांची असून मागणी मान्य झाली नाही तर रिक्षा बंदचे हत्यार उचलण्यात येईल, असा इशारा रिक्षाचालक-मालक युनियनने दिला आहे.