19 October 2019

News Flash

कॅरमपटू जान्हवीच्या अपघाती मृत्यूने रस्त्यांची दुरवस्था पुन्हा चर्चेत

पावसाळा महिनाभरावर येऊन ठेपल्याने ऐन उन्हाळ्यात रस्त्यांवरच्या खड्डय़ांनी त्रासलेल्या नागरिकांच्या पोटात भीतीने खड्डा पडला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

शिळफाटा रस्त्यावरील पलावा बस थांबा येथे रस्ता ओलांडताना ट्रकने उडवल्याने रविवारी युवा राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे हिचा मृत्यू झाला. पण या अपघाताचं खापर ‘दैवगती’वर फोडायचं की टक्केवारीच्या गणितात संवेदनशीलतेचा मृत्यू स्वीकारलेल्या प्रशासनाला जबाबदार धरायचं, हा प्रश्न चर्चेत आला आहे.

जान्हवीच्या मृत्यूची बातमी समजताच केवळ क्रीडावर्तुळातच नाही, तर सर्वसामान्यांमध्येही हळहळ व्यक्त झाली. पावसाळा महिनाभरावर येऊन ठेपल्याने ऐन उन्हाळ्यात रस्त्यांवरच्या खड्डय़ांनी त्रासलेल्या नागरिकांच्या पोटात भीतीने खड्डा पडला आहे. त्यामुळेच जान्हवी मोरे हिच्या मृत्यूमुळे पुन्हा कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील दुरवस्था झालेले रस्ते आणि खड्डय़ांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

महापालिका हद्दीतील रस्ते, खड्डे देखभाल दुरुस्तीची कामे वर्षांनुवर्षे ठरावीक ठेकेदारांना दिली जातात. या ठेकेदारांचे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांशी साटेलोटे असल्याने टक्केवारीचे ‘गणित’ पूर्ण झाले की, पुन्हा ठेकेदाराने रस्ता सुस्थितीत केला आहे की नाही,  खड्डे व्यवस्थित भरले आहेत की नाहीत, याची तपासणी करायला अधिकारी, पदाधिकारी रस्त्यावर उतरत नाही. या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांवरील खड्डय़ांमध्ये पादचारी, दुचाकीस्वारांचा आपटून, पडून मृत्यू होतो.  सध्या कल्याण-शिळफाटा रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजू खोदून ठेवल्या आहेत. अनेक वेळा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार या खोदून ठेवलेल्या खड्डय़ात पडतो. अपघातानंतर दुचाकीस्वारावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवून गुन्हाही दाखल केला जातो. त्यामुळे कोणीही व्यक्ती अपघात झाल्यानंतर पालिका, एमएसआरडीसी, एमएमआरडीए या व्यवस्थेविरुद्ध  आवाज उठविण्यास पुढे येत नाही.

कडोंमपा हद्दीतील गेल्या तीन वर्षांतील रस्ते अपघात

२९ जुलै २०१६ : कल्याण पूर्वेतील मलंग रस्त्यावर खड्डय़ात दुचाकी आपटून खाली पडलेल्या प्राजक्ता फुलोरे हिचा अंगावरून डम्पर गेल्याने मृत्यू.

२३ जानेवारी २०१८ : कल्याण पश्चिमेतील संतोषीमाता रस्ता ओलांडताना टेम्पोखाली येऊन जेस्लीन आयाकुट्टी यांचा मृत्यू.

२ जून २०१८ : कल्याणमधील शिवाजी चौकात खडीवरून दुचाकी घसरल्याने दुचाकीवरील दाम्पत्य जखमी आणि त्यांचा पुत्र आरोह आक्राळे (वय ८) याचा मृत्यू.

७ जुलै २०१८ : शिवाजी चौकातील उंचसखल रस्त्यावर दुचाकी घसरून मनीषा भोईर यांचा मृत्यू.

१० जुलै २०१८ : कोन गाव येथे खड्डय़ामुळे ट्रक उलटून रिक्षेतील हशीम शेख यांचा मृत्यू.

११ जुलै २०१८ : कल्याण पूर्वेतील मलंग रस्त्यावरील द्वारली येथे तबेला कर्मचारी अण्णा हे खड्डय़ात पाय मुरगळून खाली पडले. मागून आलेल्या वाहनाखाली येऊन त्यांचा मृत्यू.

१३ जुलै २०१८ : गांधारे पूल येथे खड्डय़ात दुचाकी आपटून खाली पडलेल्या नांदकर येथील कल्पेश जाधव या तरुणाचा मागून आलेल्या ट्रकखाली सापडून मृत्यू.

१४ जुलै २०१८ : कल्याण पूर्वेतील चिंचपाडा येथे पालिका कर्मचारी विलास दलाल दुचाकी खड्डय़ात आपटून गंभीर जखमी.

१६ जुलै १८ : बँक कर्मचारी सुरेश सान हे सूचक नाका येथे दुचाकी घसरून खड्डय़ात पडून जखमी.

१८ जुलै १८ : भारती नरे आणि मुलगी सिद्धी नेतिवली चौक येथे खड्डय़ातील खडीवर अ‍ॅक्टिव्हा दुचाकी  घसरून जखमी.

२९ जुलै २०१८ : रामचंद्र मगरे, कल्याणमधील काळा तलावजवळ खड्डय़ामुळे पत्नीसह पडले.

६ ऑगस्ट २०१८ : चेतन उमरोटकर, कल्याणातील वाडेघर रस्त्यावर पेव्हर आणि डांबरी रस्त्याच्या उंचसखलपणामुळे पत्नी, मुलीसह पडले.

१२ मे २०१९ : कॅरमपटू जान्हवी मोरे हिचा  शिळफाटा रस्त्यावरील लोढा (पलावा) बस थांबा येथे टँकरने उडविल्याने मृत्यू.

क्रीडाक्षेत्रात हळहळ

जान्हवी मोरे या अवघ्या विशीतील युवा कॅरमपटुच्या अनपेक्षित मृत्यूचा क्रीडा क्षेत्राला धक्का बसला. युवा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेतही तिने नुकतेच कांस्यपदक मिळवले होते. रविवारी ती कॅरमचा सराव करून घराकडे परतत असतानाच तिचा अपघाती मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे एका रिक्षाला उडवल्यानंतर घाबरलेला ट्रक चालक पळ काढत असतानाच हा अपघात घडला आणि या ट्रकच्या धडकेत जान्हवीचा मृत्यू ओढवला, अशी माहिती सूत्रांनी दिली. – सविस्तर क्रीडा

अभियंत्यावर कारवाईची तरतूद

ज्या रस्त्यावर अपघात होईल तो रस्ता ज्या व्यवस्थेच्या अधिपत्याखाली आहे त्या व्यवस्थेच्या अभियंत्याला अपघाताला जबाबदार धरण्यात यावे, असा शासन आदेश आहे, पण त्याची अंमलबजावणी केली जात नाही.

First Published on May 14, 2019 1:10 am

Web Title: road relocation discussions again