पावसाळ्यापूर्वी रस्त्याची कामे पूर्ण करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश
ठाणे शहरामध्ये सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या मोहिमांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून पावसाळ्यापूर्वी हे रस्ते सुस्थितीत आणण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरण मोहीम राबवलेल्या ठिकाणच्या सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहे. या कामांना वेग देण्याच्या दृष्टीने रविवारी अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी शहरातील रस्त्यांच्या कामाची पाहणी करून कामाचा वेग आणि गुणवत्ता राखण्याकरिता अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
ठाणे शहरातील महत्त्वाच्या रहदारीच्या रस्त्यांच्या रुंदीकरणाची मोहीम ठाणे महापालिकेच्या वतीने राबवली गेली असून हे काम आता पूर्ण होत आले आहे. या रस्ता रुंदीकरणामुळे वाढलेल्या रस्त्यांचे कॉँक्रीटीकरण, गटारे यासारखी कामे अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. पावसाळ्याचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असल्याने ही कामे तात्काळ पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ही कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी मुंब्रा येथील रस्त्यांच्या कामाची पाहणी केली. यामध्ये शीळ ते दिवा रस्त्याच्या एकूण १.९ किमी रस्त्याच्या कामापैकी ८०० मीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. कौसा तलाव ते स्टेडियम या रस्त्याची एकूण लांबी ९० मीटर असून त्यातील ६५ मीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.
कामे प्रगतीपथावर..
कळवा येथील बुधाजी नगर येथील १८० मीटर रस्त्यापैकी ९० मीटर रस्त्याच्या पूर्ण झाले असून उर्वरित काम प्रगती पथावर आहे. स्थानक परिसरातील रस्त्यांची कामे जवळजवळ पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. अशोक सिनेमा ते जिल्हा परिषद भवन या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून मलनि:सारण, गटार आणि पदपथाचे तेथे सुरू आहे. पोखरण रोड नं.१ वर कॅडबरी सिग्नल ते कॅडबरी गेटच्या गटाराचे कामही पूर्ण झाले असून छोटी कामे प्रगतिपथावर आहे तर उजव्या बाजूचे रेमंड सिग्नल ते वर्तकनगर नाका येथील काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. पोखरण रोड नं. १ वर गटार व संरक्षक भिंतीसह अन्य कामे काम प्रगतीपथावर आहे. कापूरबावडी ते बाळकूम या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून ही सर्वकामे पाऊस सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहेत.