विकास आराखडय़ानुसार रस्तेबांधणीसाठी पालिकेचा प्रस्ताव; स्वखर्चातून कामे करण्याचा पालिकेचा प्रस्ताव

ठाणे शहरात बांधकाम विकास हस्तांतरण हक्क प्रदान करून विकास आराखडय़ातील रस्त्यांची बांधणी अव्यवहार्य ठरू लागल्याने ठाणे महापालिकेने स्वखर्चातून ठाणे, कळवा तसेच मुंब्रा भागात नव्याने रस्ता रुंदीकरण मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचे ३० हून अधिक प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे अंतिम मंजुरीसाठी ठेवण्यात आले असून त्यामध्ये १९ प्रस्ताव महापालिका विकास आराखडय़ातील रस्ते विकसित करण्यासंबंधीचे आहेत. या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षांपासून कागदावर रहिलेले रस्ते विकसित होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर निर्माण होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी चार वर्षांपूवी रस्ते रुंदीकरण मोहीम हाती घेतली. त्यामध्ये पोखरण एक, दोन आणि तीन या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले. याशिवाय, नितीन कंपनी ते कामगार रुग्णालयापर्यंतचा रस्ता, वाघबीळ, कळवा, मुंब्रा या भागातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले. रुंद केलेल्या रस्त्यांची गेल्या काही वर्षांपासून कामे सुरू असून त्यापैकी काही रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. विकासकामांना मोठय़ा प्रमाणावर बांधकाम विकास हस्तांतरण हक्काचे वाटप करून ही बांधणी केली गेली असली तरी गेल्या काही काळापासून टीडीआरचे आर्थिक गणित व्यवहार्य होत नसल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येऊ लागल्या आहेत. त्यामुळे विकास हक्क हस्तांतर पदरात पाडून घेऊन सुरू असलेली काही रस्त्यांची कामेही रडतखडत सुरू आहेत. हे लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने स्वखर्चातून रस्ते बांधणीसाठी पुढाकार घेतला आहे.

वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने रस्ते रुंदीकरणाचा निर्णय घेतला आहे. तसेच काही ठिकाणी रस्ते रुंदीकरणासाठी बांधकामे हटविण्यात आली होती. मात्र, त्याठिकाणी रस्ते विकसित करण्यात आले नव्हते. अशा रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. त्यानुसार देसाई तलाव ते कल्याण शीळ रस्ता, देसाई नाका ते देसाई गाव, शीळ दिवा रोड, मित्तल मैदान ते चुहा पुल, खारेगाव नाका ते आत्माराम पाटील चौक, नितीन कंपनी ते कामगार रुग्णालय, कापुरबावडी ते बाळकूम नाक्यापर्यंत दोन्ही बाजूचे सेवा रस्ते तसेच अन्य रस्त्यांचा समावेश आहे. अर्थसंकल्पात रस्तेबांधणीसाठी काही कोटींची तरतूद केली आहे. या तरतुदींतून  रस्त्यांची कामे करणार आहेत, अशी माहिती बांधकाम विभागातील सूत्रांनी दिली.

या रस्त्यांचे रुंदीकरण

आगासन देसाई रोड, शीळ कल्याण रोड, बेतवडे जलकुंभ ते उसरघर, खारेगाव पारसिकनगर ते रेतीबंदर सेवा रस्ते, हायलँड गार्डन संकुल-विद्यापीठ- राम मारुती नगर, हायलँड गार्डन सर्कल ते ढोकाळी, शिव मंदिर ते ब्रह्मांड जंक्शन, क्लॅरियन कंपनी ते कोलशेत खाडी, डी-मार्ट ते कासारवडवली पोलीस ठाणे, ग्रँड स्क्वेअर रस्ता ते संघवी हिल्स, कासारडवली मेट्रो कारशेड रस्ता, गोल्डन डाइज नाका ते लोढा पॅराडाइज, रोड क्रमांक ३३ ते एमआयडीसी, ऋतू सिटी ते हावरे सिटी, वाघबीळ गाव ते कोस्टल रोड, घोडबंदर रस्ता ते पाचवड गाव, ओवळा, पोखरण दोन ते वसंत लॉन्स, भीमनगर ते पोखरण दोन, कासारवडवली ते मोघरपाडा, काव्या रेसीडेन्सी ते ठामपा मॅटर्निटी होम, अमृतांगण गृहसंकुल ते आत्माराम पाटील चौक.