महत्त्वाच्या रस्त्यांच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव; वाहतूक समस्येचा अडथळा दूर करण्यासाठी प्रयत्न

ठाण्यातील वाढत्या वाहतुकीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रशासन हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहे. त्यातच आता वाहतुकीचा अडथळा दूर करण्यासाठी रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचा घाट महापालिकेने घातला आहे. बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करत पोखरण रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग प्रशस्त केल्यानंतर ठाणे महापालिकेने घोडबंदर मार्गावरील कापूरबावडी जंक्शन, कावेसर, साकेत ते बाळकूम, बुधाजीनगर-कळवा आणि दत्तवाडी खारेगाव ते मुंबई-नाशिक महामार्गापर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी दिवसभर या सगळ्या ठिकाणांची पाहणी केली. त्यानंतर शहरविकास तसेच अभियांत्रिकी विभागासोबत चर्चा केल्यानंतर या प्रस्तावित मार्गाच्या रुंदीकरणाची घोषणा करण्यात आली.

शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी जयस्वाल यांनी रस्ता रुंदीकरण मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेचा भाग म्हणून घोडबंदर मार्गावरील सेवा रस्ते आणि पोखरण मार्गाच्या रुंदीकरणाआड येणारी बेकायदा बांधकामे पाडण्याची कामे यापूर्वीच उरकण्यात आली आहेत. या मोहिमेनंतर आता जयस्वाल यांनी शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अंत्यत महत्त्वाचे ठरणारे रस्ते तसेच चौकांच्या रुंदीकरणाचा निर्णय घेतला आहे. या पाश्र्वभूमीवर त्यांनी शहरातील विविध भागांची पाहणी केली. या पाहणीनंतर वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणाऱ्या घोडबंदर मार्गावरील कापूरबावडी जंक्शनचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे या भागातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे. याशिवाय घोडबंदर मार्गावरील मनोरमानगर ते कोलशेत मार्ग, याच मार्गावरील होरायझोन महाविद्यालय ते कावेसर रस्ता, कापूरबावडी ते बाळकूम नाका येथील रस्त्याचेही रुंदीकरण करण्यात येणार आहे. कळव्यातील बुधाजीनगर ते कळवा रुग्णालयाजवळून ठाणे बेलापूर रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गावरील अतिक्रमणे हटवून रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असून याच भागातील दत्तवाडी ते खारेगाव टोलनाक्यापर्यंतच्या अर्धवट रस्त्यांचे काम पूर्ण केले जाणार आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यास कळवा, खारेगाव पट्टय़ातून नाशिक महामार्गाच्या दिशेने जाण्याकरिता पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. नाशिक रोड मार्गावरील साकेत ते बाळकूम अशा रस्त्यांच्या रुंदीकरणाचे कामही या प्रकल्पाच्या माध्यमातून हाती घेतले जाणार आहे.

रुंदीकरणाला टीडीआरचा आधार

रुंदीकरण करत असताना या मार्गालगत येणाऱ्या बडय़ा विकासकांना विकास हस्तांतर हक्काच्या माध्यमातून बक्कळ फायदा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. वर्षांनुवर्षे या मार्गाचे रुंदीकरण रखडले आहे. त्यामुळे रुंदीकरणाचा मार्ग प्रशस्त केला जात असताना त्यालगत असणाऱ्या बिल्डरांच्या प्रकल्पांना त्याचा फायदा मिळणार आहे. जयस्वाल यांनी जाहीर केलेल्या घोडबंदर ते मनोरमानगर आणि पुढे कोलशेत रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी अंशत: बांधकाम विकास हस्तांतर हक्क प्रदान केला जाईल, अशी माहिती शहर विकास विभागातील सूत्रांनी दिली. होरायझोन महाविद्यालय ते कावेसर पट्टय़ातील रुंदीकरण अशाच पद्धतीने टीडीआरच्या माध्यमातून होणार आहे. उर्वरित रस्त्यांची कामे महापालिकेच्या निधीतून केली जातील, असे आयुक्त जयस्वाल यांनी स्पष्ट केले.