कल्याण-डोंबिवली शहरातील रस्त्यांची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण होतील हे महापालिका प्रशासनाचे आश्वासन यंदाही हवेत उरले असून या रस्त्यांच्या कामाच्या दिरंगाईबद्दल वाहतूक विभागाने महापालिकेस नोटीस धाडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ठेकेदारांना दिलेली मुदत टळून गेली तरीही ही कामे पूर्ण झालेली नाहीत. यामुळे शहरात जागोजागी वाहतूककोंडी होत असून पावसाळय़ापूर्वी मुख्य रस्त्यांवरील कामे मार्गी लावा, अशा सूचना पोलिसांनी महापालिकेस केल्या होत्या. मात्र, या सूचनांना केराची टोपली दाखविण्यात आल्याने वाहतूक पोलिसांनी महापालिकेला इंगा दाखविण्याचा निर्णय घेतला आहे.
कल्याण, डोंबिवली शहरात वाहतूक विभागाला विश्वासात न घेता अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली. त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर खोदकामे करण्यात आली. शहरभर रस्त्यांची कामे सुरू करताना अवघ्या चार ठिकाणी यासंबंधीची परवानगी घेण्यात आली. त्यामुळे वाहतूक विभागाने पालिकेला नोटिस पाठविली आहे.

कामांची संथगती
रस्त्यांची कामे अत्यंत संथगतीने सुरू असल्याचा वाहतूक पोलिसांचा दावा आहे. या वाहतूक कोंडीचा वाहन चालक, रुग्णांना सर्वाधिक त्रास होत आहे. वाहतूक कोंडीमुळे रुग्णालयात वेळेत पोहचता आले नसल्याने दीड महिन्यापूर्वी कल्याणमध्ये एका रूग्णाचा मृत्यू झाला होता. या घटनांची गंभीर दखल घेत उपायुक्त करंदीकर यांनी रस्तेकाम करणाऱ्या ठेकेदारांना १५ मेपर्यंत खोदकाम करण्याची तसेच ३१ मेपर्यंत सर्व रस्त्यांची, खोदकामाची कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. संथगती काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी वाहतूक विभागाने पालिका आयुक्तांकडे केली होती. असे असताना या संथगती कामांकडे नेहमीच दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका प्रशासनाने वाहतूक पोलिसांच्या या सूचनांना केराची टोपली दाखवली होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी आता पावसाळ्यात खोदकामे सुरूच ठेवणाऱ्या ठेकेदारांना तसेच महापालिका प्रशासनाला नोटीस पाठविण्याची तयारी सुरू केली.

डोंबिवलीत कामे सुरूच
डोंबिवली पूर्व भागात वाहतूक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर एस. के. पाटील शाळेजवळील रस्त्याचे काम घाईघाईने उरकण्यात येत आहे. शास्त्रीनगर रुग्णालय, महात्मा गांधी रस्त्याची कामे घाईघाईने उरकण्यात येत असल्याने या कामांच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण झाले आहे. गेल्या वर्षभर आराम करीत असलेल्या पालिका प्रशासनाने पावसाळ्याच्या तोंडावर रस्ते खोदकाम, सिमेंट रस्त्यांची कामे सुरूच ठेवल्याने नागरिकांच्या चिंतेचा सूर वाढला आहे.

कल्याणमधील रस्ते खोदण्याची कामे थांबवण्यात आली आहेत. सिमेंट रस्त्यांची बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत. सुरू असलेली काही कामे पावसापूर्वी पूर्ण करण्यात येतील. डांबरीकरणाची
कामे पाऊस सुरू होईपर्यंत केली जातील.
दीपक भोसले, कार्यकारी अभियंता, कल्याण</strong>

वाहतूक विभागाने आखून दिलेल्या मुदतीचे ठेकेदारांकडून उल्लंघन करण्यात आले आहे. त्यामुळे या रस्ते कामांच्या दिरंगाईला जबाबदार धरून वाहतूक विभागाने कल्याण-डोंबिवली पालिकेला नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
सयाजी डुबल, सहाय्यक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग