सर्वच शहरांतील रस्त्यांवर खड्डे; ठाण्यात मुख्य, अंतर्गत मार्गावर वाहतूक कोंडी

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्य़ात सुरू असलेल्या पावसाने महापालिकेसह सर्वच जबाबदार प्रशासकीय यंत्रणांच्या कारभाराची पोलखोल केली आहे. शहरातील मुख्य मार्ग तसेच अंतर्गत मार्गावर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. भिवंडीमध्येही रस्त्यांवरील खड्डय़ांचे आकार मोठय़ा डबक्यांइतके झाले आहेत. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. ठाणे शहरात राज्य सरकारमधील दोन मंत्री, दोन खासदार आणि चार आमदार यांचे निवासस्थान आहे, तर भिवंडीत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे निवासस्थान आहे. असे असतानाही खड्डेमुक्ती होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

ठाणे जिल्ह्य़ात सुरू असलेल्या पावसामुळे ठाणे आणि भिवंडी शहरांतील रस्ते खड्डय़ात गेल्याचे चित्र आहे. शहरातील अंतर्गत मार्ग तसेच मुख्य रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहे. ठाणे महापालिकेकडून खड्डे बुजविण्याचा दावा करण्यात येत असला तरी शहरातील रस्त्यांची दैना झाली आहे. भिवंडीत तर डबक्यांच्या आकाराचे खड्डे झाले आहेत. त्यामुळे भिवंडीत जाणारी अवजड वाहने, कार, रिक्षा, दुचाकी खड्डय़ात अडकून पडत असल्याचे चित्र आहे. पावसाळ्यात शहरात पडलेले खड्डे तातडीने बुजविले जावेत यासाठी सर्व यंत्रणांमध्ये समन्वय असावा, असे आदेश मध्यंतरी नगरविकासमंत्री एकनाथ िशदे यांनी दिले होते. गेल्या वर्षी पावसाळ्यात िशदे यांच्या आदेशामुळे महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणांनी तातडीने पावले उचलली होती. गेल्या काही दिवसांपासून शहरात कोसळत असलेल्या पावसामुळे अंतर्गत आणि महामार्गावरील रस्त्यांची चाळण झाली असून महापालिकेसह सर्व यंत्रणा पुन्हा हतबल ठरल्याचे चित्र आहे. तीन हात नाका चौक, सिग्नल परिसरात मोठे खड्डे पडले आहेत. याच मार्गावरून वाहन चालकांना मुंबई-ठाण्याच्या दिशेने ये-जा करावी लागते. खड्डय़ांमुळे येथील वाहनांचा वेगही मंदावत असतो.

कोणत्या रस्त्यांवर खड्डे?

  • कॅडबरी जंक्शन- मुंबई-नाशिक महामार्गावरील कॅडबरी जंक्शन, ज्युपिटर रुग्णालयासमोरील मार्गावर खड्डे पडले आहेत. या मार्गावर वाहनांचा वेग अधिक असतो. रात्रीच्या वेळी खड्डय़ांमुळे एखादा अपघात होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
  • घोडबंदर- घोडबंदर मार्गावरील माजिवडा, मानपाडा, कापूरबावडी सेवा रस्ता येथील अंतर्गत मार्गासह मुख्य मार्गावर खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक उखडले आहेत. त्यामुळे वाहने खड्डय़ात आपटून नुकसान होत असल्याचे चालकांचे म्हणणे आहे.
  • काल्हेर-कशेळी- कापूरबावडीहून भिवंडीच्या दिशेने जाण्यासाठी या मार्गाचा वापर केला जातो. या भागात काही गोदामेही आहेत. त्यामुळे अवजड वाहनांचीही वाहतूक होत असते. मात्र मोठय़ा डबक्याच्या आकाराचे खड्डे याठिकाणी पडल्याचे चित्र आहे.
  • अंजुरफाटा- अंजुरफाटा येथेही अशीच परिस्थिती आहे. येथील वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागतात. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहतूक पोलिसांना स्वखर्चाने येथील खड्डे बुजवावे लागत आहेत.
  • भिवंडी-वाडा- वाडा-भिवंडी मार्गाची परिस्थिती गंभीर झाली आहे. येथे अनेक मोठी वाहने अडकून पडतात. दुचाकी चालकांना दुचाकी बंद करून दुचाकी चालवीत खड्डे पार करावे लागत आहेत.
  • साकेत पूल- मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पुलावर गेल्या दोन आठवडय़ांमध्ये एमएसआरडीसीने दोन वेळा खड्डे बुजविले होते. मात्र तात्पुरती डागडुजी होत असल्याने पावसामध्ये खड्डे पुन्हा तयार होत आहे. यामुळे साकेत ते माजिवडय़ापर्यंत वाहतूक कोंडी होत आहे.
  • एलबीएस मार्ग- तीन हात नाका येथून एलबीएस-मॉडेला चेकनाकामार्गे वाहनचालक मुलुंड-भांडुपच्या दिशेने जात असतात. दोनच दिवसांपूर्वी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या भागात पाहणी करून खड्डे बुजविण्यात येतील, असे सांगितले होते. महापालिकेचे नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनीही दौरा करत खड्डे बुजविण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले होते.

असे असले तरी या भागातील खड्डे अजूनही कायम आहेत. या मार्गाची अवस्था इतकी भीषण झाली आहे की येथून मार्ग काढताना वाहनचालक हैराण झाले आहेत.