जयेश सामंत

दिव्यालगतच्या म्हातार्डी येथील स्थानकापर्यंत जाण्यासाठी नवीन रस्त्यांची आखणी; दिवा-डोंबिवली-कल्याण वाहतूक जलद होणार

मुंबई ते अहमदाबाद या शहरांदरम्यान धावणाऱ्या बुलेट रेल्वेचे ठाणे जिल्ह्य़ातील एकमेव स्थानक असलेले म्हातार्डी हे ठिकाण ठाणे तसेच कल्याण, डोंबिवलीशी जोडण्यासाठी प्रशस्त रस्ते उभारण्याचा निर्णय ठाणे महापालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतला आहे. म्हातार्डी ते आगासन आणि पुढे आगासन ते कल्याण फाटा-डोंबिवली अशा नव्या रस्त्यांची बांधणी करण्यात येणार आहे. तसेच भविष्यात या भागात वाढणारी लोकवस्ती लक्षात घेऊन आवश्यक रस्त्यांच्या उभारणीसाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याचे कामही हाती घेतले जाणार आहे, अशी माहिती ठाणे पालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली.

मुंबई-अहमदाबाद ही बुलेट रेल्वे ठाणे जिल्ह्य़ातूनही जाणार आहे. मात्र ठाणे खाडीखालून भुयारी मार्गे जाणारी ही रेल्वे महापे-शीळ रस्त्याच्या मार्गे दिवा-म्हातार्डी येथून मार्गस्थ होणार आहे. म्हातार्डी येथे या मार्गावर स्थानक उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दिवा-पनवेल अशी रेल्वेसेवाही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि ठाणे महापालिकेने दिवा परिसरातील रस्त्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आखलेल्या नव्या प्रस्तावानुसार म्हातार्डी ते आगासन हा ६० मीटर लांबीचा प्रशस्त असा विकास आराखडय़ातील रस्ता तयार करण्याचे नियोजन असून आगासन ते कल्याण शीळ फाटा या नव्या रस्त्याची बांधणी केली जाणार आहे.

कल्याण फाटा-डोंबिवलीवरून दिवा परिसराकडे येणारा सद्य:स्थितीतील रस्ता जेमतेम सहा मीटर रुंदीचा रस्ता असून रस्त्याची रुंदी कमी असल्याने या ठिकाणी दररोज मोठी वाहतूक कोंडी होत असते. हे लक्षात घेता नियोजित बुलेट ट्रेन स्थानक, दिवा-पनवेल रेल्वे मार्ग आणि कल्याण फाटा-डोंबिवलीस जोडणारा नव्या रस्त्याचा शोध महापालिकेने सुरू केला असून यासंबंधी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून तो मुंबई महानगर विकास प्राधिकरणास सादर केला जाईल, अशी माहिती आयुक्त जयस्वाल यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. तसेच दिवा-डोंबिवली-कल्याण अशा प्रशस्त रस्त्याचा नवा मार्गही यामुळे विकसित होणार असल्याने सद्य:स्थितीत अस्तित्वात असलेल्या कल्याण-शीळ मार्गावरील भार कमी होऊ शकेल, असा दावाही त्यांनी केला.

म्हातार्डी येथील नियोजित बुलेट ट्रेन स्थानकाकडे भविष्यात रहदारी वाढणार आहे. त्यामुळे आतापासूनच या भागातील रस्त्यांचे नियोजन करण्याची आवश्यकता असून या भागात उभ्या राहणाऱ्या नव्या संकुलांमधून राहावयास येणाऱ्या नागरिकांनाही हे नियोजन सोयीचे ठरेल.

– संजीव जयस्वाल, आयुक्त, ठाणे महापालिका