६० टक्के वाहतूक कमी झाल्याचा वाहतूक पोलिसांचा दावा

ठाणे : कडक र्निबधांच्या काळात गेल्या १० ते १५ दिवसांपासून शहरात रस्त्यावर येणाऱ्या वाहनांचे प्रमाण ६० टक्क्यांनी कमी झाल्याचे ठाणे पोलिसांनी केलेल्या निरीक्षणातून समोर आले आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या खासगी चारचाकी वाहनांचे प्रमाण दिवसाला ६० हजारहून २५ हजार इतके कमी झाले आहे, असा दावा शहर वाहतूक शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. शनिवार आणि रविवारी हे प्रमाण १२ हजारांपर्यंत कमी झाले आहे.

राज्यात ५ एप्रिलपासून र्निबध लागू करण्यात आले. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता तसेच वैध कारणांव्यतिरिक्त इतर वाहनांना ये-जा करण्यास बंदी आहे. त्यामुळे ठाणे वाहतूक शाखेकडून विनाकारण वाहने घेऊन फिरणाऱ्यांची वाहने जप्त केली जात आहेत. या कारवाईचा चांगला परिणाम आता दिसू लागला आहे. ठाणे शहरात दिवसाला हजारो वाहने रस्त्यावर येत होती. त्याचे प्रमाण घटून ते ६० टक्क्यांवर आले आहे. तसेच नागरिक वाहने घेऊन बाहेर पडत नसल्याने रस्त्यांकडेला उभी राहणाऱ्या वाहनांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे रस्ते मोकळे झाले असून कामानिमित्ताने बाहेर पडणाऱ्यांची पाच ते १० मिनिटांची बचत होत आहेत.

ठाणे पोलिसांनी मुलुंड टोलनाका येथून मुंबईच्या दिशेने ये-जा करणाऱ्या वाहनांचीही आकडेवारीचे निरीक्षण केले. मुलुंड टोलनाक्यावरून दिवसाला ६० हजार चारचाकी वाहने मुंबईच्या दिशेने ये-जा करतात. मात्र, याचे प्रमाण गेल्या १० दिवसांपासून दिवसाला २५ हजार झाले आहे. तर, शनिवारी आणि रविवारी या सुट्टय़ांच्या दिवसांत टाळेबंदीपूर्वी २५ हजार वाहने धावत होती. त्याचे प्रमाण आता १२ हजार झालेले आहे. र्निबधांमुळे आता अत्यावश्यक किंवा कामानिमित्ताने मुंबईत जात असल्याने त्यांची वाहने वाहतूककोंडीत अडकण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. आता वाहनांची संख्या घटल्याने सकाळीही वाहनचालकांना मोकळा रस्ता मिळतो, असे कोपरी वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कवयित्री गावीत यांनी सांगितले.

र्निबधांमुळे शहरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू असतात. त्यामुळे नागरिकांचे वाहने घेऊन बाहेर पडणे बंद झाले आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक संख्या घटल्याचे चित्र आहे.

– बाळासाहेब पाटील, उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा