News Flash

रस्त्यावर पार्किंग केल्यास दंड

रस्त्यांवर बेकायदा उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांवर तसेच पदपथ अडवून वाहने दुरुस्ती वा विक्रीचा व्यवसाय थाटणाऱ्यांविरोधात ठाणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाई मोहीम हाती घेतली

| June 12, 2015 12:36 pm

रस्त्यावर पार्किंग केल्यास दंड

रस्त्यांवर बेकायदा उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांवर तसेच पदपथ अडवून वाहने दुरुस्ती वा विक्रीचा व्यवसाय थाटणाऱ्यांविरोधात ठाणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाई मोहीम हाती घेतली आहे. अशा प्रकारे वाहने उभी करणाऱ्यांना सव्वाशे रुपयांपासून २० हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यात सायकली उभ्या करणाऱ्यांनाही दंडपात्र ठरवण्यात आले आहे. यामुळे शहरात रस्ते अडवून वाहने उभी करण्याला चाप बसणार असला तरी शहरात पुरेसे वाहनतळ नसल्याने पार्किंगचा पेच मात्र वाढण्याची चिन्हे आहेत.

ठाणे शहरातील वाढत्या वाहनसंख्येमुळे शहरातील रस्ते वाहतुकीस अपुरे पडत आहेत. अशातच शहरात पुरेसे वाहनतळ नसल्याने वाहनांच्या पार्किंगचाही पेच निर्माण होत आहे. वाहनतळ नसल्याने रस्त्याच्या कडेलाच गाडय़ा उभ्या करण्याचे प्रमाण जास्त आहे. याचा परिणाम रस्त्यांवरील वाहतूक कोंडीवर भर पडण्यात होऊ लागला आहे. त्यातच अनेक ठिकाणी गॅरेज व्यावसायिक तसेच वाहनविक्री करणाऱ्या दुकानदारांनीही आपल्या दुकानासमोरील पदपथ आणि रस्त्याचा भाग अडवून वाहने उभी केली आहेत. या सर्वामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत.

या पाश्र्वभूमीवर ठाणे वाहतूक पोलिसांनी महापालिकेच्या सहकार्याने बेकायदा वाहन पार्किंगविरोधात कडक मोहीम हाती घेतली आहे. परवानगी नसताना रस्त्यांच्या कडेला वाहने उभी करणाऱ्यांवर आता थेट दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी आणि चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असा या मोहिमेमागे हेतू आहे. मध्यंतरी, सर्वसाधारण सभेत यासंबंधी मंजूर झालेल्या ठरावाच्या आधारे ही कारवाई करण्यात येणार असून या ठरावातील दरानुसार अवजड, हलकी, चारचाकी, दुचाकी आदी वाहनांसह सायकल आणि खेळण्याच्या पाळणाचालकांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी शहरातील वाहनतळाच्या ठिकाणी वाहने उभी करावीत. तसेच पदपथ व रस्ते अडवून दुरुस्ती आणि विक्रीचा व्यवसाय करू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2015 12:36 pm

Web Title: roadside parking will be fined
टॅग : Fine,Parking
Next Stories
1 कल्याण-डोंबिवलीतील १६० धोकादायक इमारती रिकाम्या करा!
2 भरमसाट वीजबिलाने डोंबिवलीकर संतप्त ग्राहकांचा महावितरण कार्यालयावर मोर्चा
3 मोटारसायकल चोऱ्यांमध्ये वाढ
Just Now!
X