मुसळधार पावसामुळे ठाण्यातील रस्ते १५ दिवसांत उखडले; वाहनचालक, प्रवासी हैराण

ठाणे : महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील खड्डेभरणीची कामे प्रशासनाने १५ दिवसांपूर्वीच पूर्ण केली होती. मात्र गेल्या चार दिवसांपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील खड्डे पुन्हा उखडल्याचे दिसून येत आहे. काही भागांत रस्त्यांवर नवीन खड्डे पडले आहेत. या खड्डय़ांच्या प्रवासामुळे वाहनचालक, प्रवासी हैराण झाले आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये जून महिन्याच्या मध्यावधीत मोठय़ा प्रमाणात पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले होते. पाऊस थांबल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शहराचा पाहणी दौरा केला होता. त्या वेळेस अनेक रस्त्यांवर खड्डे पडल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. तसेच रस्त्यावर खड्डे पडल्याच्या तक्रारी पालिकेकडे येऊ लागल्या होत्या. याची गंभीर दखल घेत आयुक्त शर्मा यांनी शहरातील सर्वच रस्त्यांचे प्रभाग समितीनिहाय सर्वेक्षण करून खड्डय़ांची माहिती गोळा करण्याचे आणि त्याची गूगल नकाशावर नोंद करण्याचे आदेश दिले होते. तसेच रस्त्यांवरील सर्वच खड्डे बुजविण्याचे आदेशही त्यांनी दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रभाग समितीनिहाय रस्त्यांवरील खड्डय़ांचे सर्वेक्षणाचे काम हाती घेतले होते. त्यामध्ये रस्त्यांवर १ हजार २२२ खड्डे असल्याची बाब पुढे आली होती. ही आकडेवारी समोर आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डेभरणीची कामे हाती घेतली होती. पंधरा दिवसांपूर्वीच खड्डेभरणीची कामे पूर्ण झाली होती. परंतु गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बुजविलेले खड्डे पुन्हा उखडले असून काही रस्त्यांवर नवीन खड्डे पडले आहेत.

या खड्डय़ांमध्ये पावसाचे पाणी साचते. त्यामुळे हे खड्डे चालकांच्या निदर्शनास येत नसल्यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. घोडबंदर, कापुरबावडी, सेवा रस्ते, कॅडबरी उड्डाणपुलांच्या पायथ्याशी, नितीन कंपनी चौक, सावरकरनगर, लोकमान्यनगर, कोरस रस्ता, मॉडेला नाका येथील अ‍ॅपलॅब चौक, कळवा, मुंब्रा आणि दिवा भागांतील रस्त्यांवर खड्डे पडल्याचे दिसून येत आहे.

उड्डाणपूल खड्डेमुक्त

ठाणे शहरातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावरील तीन हात नाका, नितीन कंपनी आणि माजिवाडा उड्डाणपुलांवर तर, घोडंबदर भागातून जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कापुरबावडी, मानपाडा, पातलीपाडा आणि वाघबिळ या उड्डाणपुलांवर दरवर्षी पावसाळ्यात मोठे खड्डे पडतात. त्याचा वाहतुकीवर परिणाम होतो. पावसाळ्यापूर्वी उड्डाणपुलांवरील रस्त्यांची कामे मास्टिक पद्धतीने करण्यात आलेली आहेत. त्यामुळे यंदा या दोन्ही मार्गावरील उड्डाणपूल खड्डेमुक्त असल्याचे दिसून येते. माजिवाडा येथील मुंबई दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर मात्र खड्डे पडल्याचे दिसून येते.

ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काही रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. सततच्या पावसामुळे खड्डेभरणीची कामे करणे शक्य होत नाहीत. त्यामुळे पाऊस थांबताच खड्डे बुजविण्याची कामे पुन्हा हाती घेण्यात येणार आहेत. काँक्रीटच्या साहाय्याने हे खड्डे बुजविले जाणार आहेत.

– रवींद्र खडताळे, नगर अभियंता, ठामपा