ठाणे स्थानकाजवळ वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात

लांबपल्ल्याच्या रेल्वेगाडय़ांतून ठाणे स्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांकडून मनमानी भाडेवसुली करून त्यांची लूट करणाऱ्या रिक्षाचालकांचा बंदोबस्त करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पावले उचलली आहेत. रिक्षांअभावी प्रवाशांना स्थानकात ताटकळत उभे राहावे लागू नये आणि मनमानी भाडे आकारणाऱ्या रिक्षाचालकावर कारवाई करण्यासाठी तात्काळ मदत मिळावी, या उद्देशातून ठाणे वाहतूक पोलिसांनी स्थानकात दोन ठिकाणी बुथ उभारले आहेत. या बुथवर रात्रीच्या वेळेस प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, यामुळे रात्रीच्या वेळेस मनमानी भाडे आकारण्याच्या प्रकारांना चाप बसण्याची चिन्हे आहेत.

ठाणे पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात वाटेल तिथे रिक्षा उभ्या करून प्रवाशांची वाट अडविण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. या रिक्षाचालकांना रांगेची शिस्त लावण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी गेल्या काही महिन्यांपासून कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनीही १५ दिवसांपूर्वी स्थानक परिसराची रात्रीच्या वेळेत पाहणी केली. त्यावेळी स्थानकात थांबा असलेल्या परराज्यातील एक्स्प्रेस गाडय़ांमधील प्रवाशांकडून रिक्षाचालक मनमानी भाडे आकारून त्यांची अडवणूक करत असल्याची बाब उपायुक्त काळे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी अशा रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारून ६० ते ७० प्रवाशांना रिक्षामध्ये बसवून दिले. मात्र, असे प्रकार रोज घडत असून रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची लूट करण्यात येते, अशी तक्रार काही प्रवाशांनी केली. तसेच स्थानकात पोलीस चौकी नसल्यामुळे रिक्षाचालकांच्या मनमानीला चाप बसत नाही, याकडेही काही प्रवाशांनी लक्ष वेधले. याची दखल घेऊन काळे यांनी वाहतूक पोलिसांचे दोन बुथ स्थानक परिसरात उभारले आहेत. त्यापैकी सॅटीस पुलाखालील रिक्षा थांब्याजवळ तर दुसरा अलोक हॉटेलजवळील परिसरात आहे. या बुथवर रात्रीच्या वेळेस प्रत्येकी दोन कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

परराज्यातून येणाऱ्या एक्स्प्रेस गाडय़ांमधील प्रवाशांकडे रिक्षाचालक मनमानी भाडे मागून त्यांची वाट अडवितात. रात्रीच्या वेळेस गस्तीदरम्यान ही बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या मदतीसाठी स्थानकात बुथ उभारून त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

अमित काळे, पोलीस उपायुक्त, ठाणे वाहतूक