बोईसर चित्रालय भागातील एका नामांकीत ज्वेलर्समध्ये बुधवारी पहाटे चोरट्यांनी दरोडा टाकला. दुकानाच्या वरच्या बाजूला असलेल्या एका कार्यालयाच्या भिंतीला छिद्र पाडून चोरट्यांनी हा डाव साधला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे ही चोरी करण्यासाठी चोरट्यांनी सोसायटीमधील एका नवीन सुरक्षारक्षकाची मदत घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

ज्वेलर्स दुकानाच्या इमारतीमध्ये वरच्या बाजूला असलेल्या ‘सिस्टम फॉर सक्सेस’ या ऑफीस मधून ज्वेलर्सच्या भिंतीला छिद्र पाडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. साधारणपणे रात्री दोन वाजताच्या सुमारास चोरीच्या हालचाली सुरू झाल्याचे इमारतीमधील सीसीटीव्हीत दिसून येत आहे. चोरट्यांनी ज्वेलर्स मधील साधारण ६ किलो सोने व ७० लाख रूपये रोकड अशी कोट्यवधी रुपयांची चोरी केली आहे.

दुकानातील तिजोरी फोडण्यासाठी चोरट्यांनी गॅस कटरचा वापर केला होता. नंतर तपासादरम्यान गॅस कटरसाठी वापरण्यात आलेला सिलेंडर इमारतीच्या वॉचमनच्या खोलीवर सापडला ज्यामुळे या चोरीट वॉचमनचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. बोईसर पोलीस आणि स्थानिक गुन्हा शाखा या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.