भिवंडीतील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात झालेल्या दरोडा प्रकरणी ठाणे ग्रामीण पोलिसांनी पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी शहापूर परिसर आणि दादरा व नगर हवेली येथून पाच दरोडेखोरांना अटक केली असून, ते ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलं.

दरोड्यातील रक्कमेपैकी तीन लाख ८३ हजारांचा ऐवजही पोलिसांनी हस्तगत केला आहे. पाचही दरोडेखोरांना न्यायालयात हजर केले असता त्यांना २७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हे दरोडोखोर सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापुर्वी जबरी चोरी, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न आदी गंभीर गुन्हे दाखल असल्याचे देखील समोर आले आहे.

१० मे रोजी शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास चार ते पाच दरोडेखोर वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात गेले. मंदिरातील सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवत त्याला खांबाला बांधले. यानंतर त्यांनी मंदिरातील पाच दानपेट्या तोडल्या आणि त्यामधील १० ते १२ लाख रुपयांची रोकड घेऊन पळ काढला होता. दोन आठवड्याच्या आतमध्ये पोलिसांनी चोरांचा शोध घेत बेड्या ठोकल्या आहेत.