एक लाख २० हजारांचा ऐवज लंपास
बदलापुरातील चोरी आणि दरोडय़ांच्या घटनांचे लोण आता अंबरनाथमध्येही पोहोचले आहे. अंबरनाथमधील बी कॅबिन परिसरातील गजराज अपार्टमेंटमधील दोन घरांत शस्त्रांचा धाक दाखवत दरोडा टाकण्यात आला. मात्र दोन तरुणांच्या प्रसंगावधानाने दरोडेखोरांनी पळ काढला.
अंबरनाथमधील बी कॅबिन परिसरातील गजराज अपार्टमेंटमधील गजानन कदम यांच्या घरात चार ते सहा दरोडेखोरांनी प्रवेश करत त्यांच्या कुटुंबातील दोन लहान मुली आणि पती-पत्नीला बांधून त्यांच्या घरातील एक लाख वीस हजारांचा ऐवज लंपास केला. त्यानंतर कदम कुटुंबीयांना तशाच बांधलेल्या परिस्थितीत ठेवून दरोडेखोरांनी आपला मोर्चा बनसोडे यांच्या घराकडे वळविला. मात्र त्या वेळी घरातील दोन तरुण हॉलमध्येच असल्याने त्यांनी दरोडेखोरांना तात्काळ प्रतिकार करण्यास सुरुवात केली. या प्रतिकारामुळे बिथरलेल्या दरोडेखोरांनी निखिल बनसोडे यांच्या हातावर वार केला. या प्रतिकारामुळे आरडाओरडा झाल्याने लागलीच दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. त्याच्यामागे निखिल निघाला असता त्यास समोरचे कदम यांचे घर उघडे दिसले. घर उघडे असूनही कदम मदतीला का आले नाहीत, याची चौकशी करण्यास गेलेल्या निखिलला कदम कुटुंबीय बांधलेल्या अवस्थेत सापडले. शिवाजी नगर पोलीस ठाण्यात दरोडय़ाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.