गुन्हे अन्वेषणच्या उल्हासनगर शाखेकडून चोरटा जेरबंद
गेल्या चार वर्षांपासून घरफोडीच्या गुन्ह्य़ात सक्रिय असलेल्या मुन्ना ऊर्फ कुर्बान सय्यद (४०) या अट्टल घरफोडय़ाला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या उल्हासनगर युनिटने फिल्मी स्टाईलने जेरबंद केले आहे. पोलिसांनी रचलेल्या सापळ्याचा सुगावा लागताच त्याने नदीच्या पात्रात उडी घेऊन पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तब्बल दीड किलोमीटरचे अंतर पोहून त्याला अटक केली. विशेष म्हणजे कुर्बानच्या विरोधात यापूर्वी १५ घरफोडीचे गुन्हे दाखल असून त्याच्याकडून आणखी ५३ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून घरफोडीचे गुन्हे वाढत असल्याचे चित्र आहे. तसेच यापैकी काही गुन्ह्य़ांतील कार्यपद्धतीवरून हे गुन्हे कुर्बान आणि त्याच्या साथीदारांनी केल्याचा संशय ठाणे पोलिसांना होता. यामुळे गेल्या चार वर्षांपासून पोलिसांची पथके त्याच्या मागावर होती. मात्र तो पोलिसांच्या तावडीत सापडत नव्हता. उल्हासनगर येथील नदीच्या झाडाझुडपात तो गेल्या काही दिवसांपासून राहात होता. त्याच्या या ठावठिकाण्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या उल्हासनगर युनिटला मिळाली. त्याआधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे, पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांच्या पथकाने त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. मात्र त्याचा सुगावा लागल्याने त्याने तेथून पलायन करण्यासाठी नदीच्या पात्रात उडी घेतली. त्यापाठोपाठ पोलिसांनीही नदीच्या पात्रात उडी घेतली. तब्बल दीड किलोमीटर अंतरापर्यंत पोहून पोलिसांनी त्याला अखेर जेरबंद केले, अशी माहिती मणेरे यांनी दिली.
त्याच्याविरोधात यापूर्वी १५ घरफोडींचे गुन्हे दाखल असून त्यामध्ये त्याला अटक झाली होती, असेही त्यांनी सांगितले.

सराफांकडे दागिने गहाण..
कुर्बान सय्यद हा मुळचा केरळ राज्यातील रहिवाशी आहे. तो गेल्या काही वर्षांपासून कर्नाटक राज्यात स्थायिक झाला आहे. या राज्यातील चिकमंगळूर भागात त्याचे घर आहे. डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये त्याने दोन साथीदारांच्या मदतीने सुमारे ५३ घरफोडय़ा केल्या आहेत. या गुन्ह्य़ाची कबुलीही त्याने पोलिसांना दिली आहे. तसेच या गुन्ह्य़ात चोरलेले सोन्याचे दागिने तो कर्नाटक राज्यातील सराफांकडे गहाण ठेवायचा आणि त्यांच्याकडून पैसे घ्यायचा. त्याचप्रमाणे त्याने काही सोन्याचे दागिने घरामध्ये लपवून ठेवले होते. त्यांच्याकडून विविध गुन्ह्य़ांमध्ये चोरीस गेलेले ९५४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहे. तसेच त्याच्या उर्वरित दोन साथीदारांचा शोध सुरू आहे, अशी माहितीही पोलीस उपायुक्त मणेरे यांनी दिली.