गेल्या अनेक दिवसांपासून बदलापूर शहरात होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून धक्कादायक बाब म्हणजे गेल्या तीन चोरीच्या घटनांमध्ये दोन घटना या दिवसाढवळ्या घडल्या असल्याने शहरात भीतीचे वातावरण आहे. अशीच एक घटना बदलापूर पश्चिमेतील वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या इमारतीत घडली आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवल्यानंतर चोरांनी दिवसा चोरी करण्याकडे आपला मोर्चा वळविला आहे.
बेलवली परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयासमोरील श्रीसुधा सोसायटीत चोरीची ही घटना घडली असून यात सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख असा एकूण दोन लाख ६० हजार रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी लुटला. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणारे अनिल मोरे यांच्या घरात सायंकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास ही चोरी झाल्याचे बोलले जाते. त्या दिवशी मोरे यांची पत्नी आणि मुले कर्जत येथे गेले होते.
दुपारी जेवायला घरी येणारे मोरे साडेचार वाजता बँकेत जाण्यासाठी घराबाहेर पडले. ती वेळ साधून चोरटय़ांनी लोखंडी ग्रीलचा दरवाजाची कडी कापून आतील दरवाजा उचकटून घरात प्रवेश केला. त्यांनी घरातील कपाट फोडून कपाटातील सोने आणि चांदीचे दागिने तसेच मुलांच्या फीसाठी आणलेली रोख ४५ हजारांची रक्कम असा सुमारे दोन लाख ६० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरला. याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. या इमारतीसमोर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरूआहे. श्रीसुधा या इमारतीच्या सी.सी.टी.व्ही.चे फुटेज पोलिसांना देण्यात आलेले आहेत.
त्यात इमारतीमध्ये संशयित शिरताना दिसत असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी पी.एस.आय. कांबळे अधिक तपास करीत आहेत. मात्र दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दिवसा होणाऱ्या चोरीच्या घटनांमध्ये सहसा ओळखीच्या आणि जाणकार लोकांचाच हात असू शकतो, असे सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, गेल्या आठवडय़ात झालेल्या हेंद्रेपाडय़ातील हत्येमागे चोरीचा उद्देश असल्याचे बोलले जाते. चोरांची मजल थेट हत्येपर्यंत गेल्याने शहरात भीतीचे वातावरण आहे.

चोरीच्या अधिक घटना दिवसा
बदलापुरात दिवसाढवळ्या चोरी होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या चोरीच्या घटनांपैकी अधिक घटना या दिवसाढवळ्या घडलेल्या आहेत. उन्हाळाच्या सुट्टय़ांमध्ये अनेक जण गावी गेलेले असल्याने चोरींच्या घटनांत वाढ झाल्याचे येथे बोलले जाते. मात्र चोरांच्या या दिवसा चोरी करण्याच्या फंडय़ाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जास्तीच्या गस्तीमुळे रात्रीच्या वेळी होणाऱ्या घटनांना आळा घालण्यात पोलिसांना काही प्रमाणात यश आले होते, मात्र आता भर दिवसा चोरी करण्यापर्यंत चोरांची मजल गेली आहे.