News Flash

ठाणे मनोरुग्णालय बनले मृत्यूचा सापळा! छताचा भाग कोसळला

१०२ रुग्णांना अन्यत्र हलवले, दुरुस्तीसाठी २४ कोटींची गरज

संदीप आचार्य 

तब्बल १०० वर्षांहून जुने असलेले ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय हे तेथील मनोरुग्ण व कर्मचाऱ्यांसाठी मृत्यूचा सापळा बनले आहे. दोनच दिवसांपूर्वी येथील इमारतीच्या छताचा मोठा भाग कोसळला. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने येथील १०२ मनोरुग्णांना तातडीने अन्यत्र हलवले आहे. गंभीर बाब म्हणजे ठाणे मनोरुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी किमान २४ कोटी रुपयांची आवश्यकता असून गेली दोन वर्षे सातत्याने याची मागणी करूनही आजपर्यंत फुटकी कवडीही मिळालेली नाही.

अलीकडेच आरोग्य विभागाच्या भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु विभागात लागलेल्या आगीत होरपळून व गुदमरुन १० बालकांचा मृत्यू झाला. या घटनेनेनंतर हादरलेल्या सरकारने तात्काळ चौकशी समिती नेमली व काही डॉक्टर व परिचारिकांना निलंबित केले. तसेच सर्व जिल्हा रुग्णालयांचे परिक्षण करण्याचे आदेश जारी केले. ठाणे मोनोरुग्णालय शंभर वर्षे जुने असून येथील तब्बल ११ इमारती धोकादायक बनलेल्या असून याबाबतचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने यापूर्वीच दिला आहे तर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक गेली दोन वर्षे सातत्याने आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहून निधीची मागणी करत आहेत.

मात्र आजपर्यंत त्यांना निधी मिळालेला नाही. अशातच येथील इमारत क्रमांक १३ व १४ मधील छताचा भाग दोन दिवसांपूर्वी कोसळल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील रुग्ण तात्काळ अन्यत्र हलविण्यास सांगितले. त्यानुसार काल इमारत क्रमांक १३ मधील ७१ मनोरुग्ण व १४ मधील ३१ मनोरुग्ण असे १०२ रुग्ण अन्यत्र हलविण्यात आले आहेत. तथापि करोनाची साथ लक्षात घेता या रुग्णांना सुरक्षित अंतरावर ठेवणे शक्य नसल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले.

मनोरुग्णालयात गेल्या काही वर्षात छताचा भाग कोसळून तसेच गंजलेले ग्रिल आणि तुटलेल्या फरशांवरून पडून अनेकदा रुग्ण जखमी झाले आहेत. रुग्णालयातील जिने हे ‘धोक्याचे जिने’ बनले आहेत. येथील काही इमारती तर मृत्युचा सापळा बनल्या असून डॉक्टर व कर्मचारी जीव मुठीत धरून काम करत असल्याचे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे.
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात एकूण ७३ इमारती आहेत. यामध्ये पुरुष रुग्णांसाठी १४ तर स्त्री रुग्णांसाठी १५ इमारती आहेत. रुग्णाच्या इमारतींपैकी पुरुष मनोरुग्णांच्या ७ तर स्त्री विभागाच्या ५ इमारती अशा १२ इमारती या धोकादायक बनल्या आहेत.

२०१७ साली या इमारतींचे ऑडिट करण्यात आले तेव्हापासून रुग्णालयाच्या अधिकार्यांकडून इमारत दुरुस्तीसाठी वारंवार निधी मागितली जात आहे. दोन वर्षांपूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आल्यानंतर येथील इमारतींच्या दुरुस्तीसाठी २४ कोटी रुपयांचे प्रस्तावही पाठविण्यात आले. मात्र आजपर्यंत एक रुपयाही दुरुस्तीसाठी देण्यात आला नसल्याचे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकार्याने सांगितले. आगामी पावसाळ्यापूर्वी या इमारतींची दुरुस्ती झाली नाही तर येथील काही इमारती कोसळून मोठी दुर्घटना होईल, अशी भीती येथील डॉक्टर व्यक्त करतात. रेल्वे मार्ग शेजारी असल्यामुळे जुन्या झालेल्या इमारतींना हादरे बसत असतात तसेच काही बीमचही मोठ नुकसान झाल्याने तातडीने दुरुस्ती हाच एक पर्याय आहे. येथील ड्रेनेज व अंतर्गत रस्ते कमालीचे खराब झाले असून पावसाळ्यात येथे काम करणे ही नरकयातना असल्याचे डॉक्टर व कर्मचार्यांचे म्हणणे आहे.

सुदैवाने छताचा भाग कोसळून कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. अन्यथा दोनचार डॉक्टरांना निलंबित करून भंडारा प्रमाणेच प्रकरण दाबले गेले असते अशी भीतीही यथील डॉक्टरांना वाटते. ( पूर्वार्ध)

इमारती धोकादायक
रुग्णालयातील अनेक इमारती धोकादायक असून दुरुस्तीसाठीचे प्रस्ताव आम्ही आरोग्य विभागाकडे पाठवले आहेत. परवा छताचा मोठा भाग कोसळल्यानंतर येथील १०२ रुग्णांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. मात्र आगामी पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती न झाल्यास मोठी दुर्घटना घडू शकते.
– डॉ. संजय बोदडे, वैद्यकीय अधिक्षक, ठाणे मनोरुग्णालय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2021 4:01 pm

Web Title: roof collapse of thane mental hospital patient shifted to another ward dmp 82
Next Stories
1 अडथळे आणणारेच कामाची गती मोजतात!
2 पत्रीपूल वाहतुकीसाठी खुला
3 कोपरी पुलावरील तुळया बसवण्याचे काम पूर्ण
Just Now!
X