लुटीला प्रशासनाचा चाप; दिवसाला खोलीभाडे २००० रुपयांपेक्षा अधिक नको!

जयेश सामंत, लोकसत्ता

mutual fund, market, investment, Assets, small cap
स्मॉल कॅप फंडांमधील मालमत्ता २.४३ लाख कोटींवर
More than average rainfall this year Know the weather forecast of monsoon rains
Monsoon Season Update : यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस… जाणून घ्या मोसमी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
Tejasvi Surya files nominations papers
पाच वर्षांत संपत्ती १३ लाखांवरून ४ कोटी; कोण आहेत भाजपाचे तेजस्वी सूर्या?
loss firms donate electoral bonds
तोट्यात असणाऱ्या ३३ कंपन्यांकडून ५४२ कोटी रुपयांचे रोखे दान, एकट्या भाजपाला मिळाले तब्बल…

ठाणे : ठाणे शहरातील करोनाबाधित परंतु लक्षणे नसलेल्या रुग्णांना अलगीकरणाचा हवा तसा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी महापालिकेने निश्चित केलेल्या खासगी हॉटेलांमधील चढय़ा दरांच्या लुटीला प्रशासनाने अटकाव घातला आहे. शहरातील नऊ खासगी हॉटेलांना यापुढे दिवसाला प्रती रुम दोन हजार रुपयांपेक्षा अधिकचे भाडे आकारता येणार नाही, असे स्पष्ट आदेश आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी काढले आहेत. यामध्ये दोन्ही वेळचे जेवण, सकाळ-सायंकाळची न्याहरीचा समावेश केला आहे.

राज्य आणि केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कोणतीही लक्षणे नसलेल्या अथवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना त्यांच्या विनंतीनुसार घरात अथवा हॉटेलांमध्ये अलगीकरणाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. ठाणे शहरात गेल्या पंधरवडय़ापासून करोनाचा संसर्ग प्रामुख्याने उच्चभ्रु इमारतींमध्ये होताना दिसत आहे. दाट लोकवस्त्यांपुरता वाढणारा हा संसर्ग घोडबंदर, नौपाडासारख्या विभागात अधिक होत असल्याचे चित्र आहे. याठिकाणी मोठय़ा घरांचा पर्याय उपलब्ध असला तरी एकाच कुटुंबांतील अनेकांना संसर्ग होत असल्यामुळे त्यापैकी काहींना अलगीकरणाशिवाय पर्याय नाही. काही नागरिक आपल्यामुळे घरातील इतर मंडळींना संसर्ग होऊ नये यासाठी मोठे घर असूनही अलगीकरणाचा पर्याय स्विकारतात. त्यांसाठी महापालिकेचे अलगीकरण केंद्र उपलब्ध असले तरी अधिक चांगला आणि खर्चिक पर्याय स्विकारण्याकडेही अनेकांचा कल आहे. ठाणे महापालिका प्रशासनाने करोनाच्या पहिल्या टप्प्यापासून शहरातील काही खासगी हॉटेलांमध्ये अशा प्रकारे अलगीकरणाची व्यवस्था उपलब्ध करुन दिली आहे. यानुसार आतापर्यंत नऊ हॉटेलांमधील ४०० हून अधिक खोल्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या खोल्यांमध्ये केंद्र सरकारच्या ‘वंदे भारतीय’ मोहिमेद्वारे परदेशातून आलेल्या नागरिकांनाही अलगीकरणात ठेवले जात आहे. ही व्यवस्था उपलब्ध करून देत असताना महापालिकेने या ठिकाणची दरव्यवस्था मात्र निश्चित केली नव्हती. त्यामुळे काही ठिकाणी दिवसाला पाच हजारांपासून अधिकचे दरही आकारले जात होते. वंदे भारतीय मोहीमेतील नागरिकांना १० ते १४ दिवसांच्या अलगीकरणासाठी ८० हजार ते सव्वा लाख रुपयांचे दरपत्रक आकारले जात होते. यासंबंधीच्या तक्रारी वाढू लागल्याने महापालिका प्रशासनाने सर्वच हॉटेल व्यवस्थापनांना नवे दरपत्रक बंधनकारक केले असून यानुसार एकाही हॉटेल व्यवस्थापनाला दिवसाला प्रती खोली (वातानुकुलीत) दोन हजार रुपयांपेक्षा अधिकचे दर आकारता येणार नाहीत, असे आदेश आहेत.

स्वखर्चाने अलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून देत असताना अशा रुग्णांना परवडेल अशा दरात व्यवस्था उपलब्ध करून देणे हे महापालिकेचे काम आहे. त्यामुळे दरांची निश्चिती करण्यात आली असून यामुळे महापालिकेच्या अलगीकरणाच्या इतर व्यवस्थेवरील ताणही कमी होऊ शकणार आहे.

– डॉ. विपीन शर्मा, आयुक्त, ठाणे महापालिका