23 January 2020

News Flash

ऐन गुरुपौर्णिमेला गुलाबाला चढा भाव

मुंबई, ठाण्याच्या बाजारांत पुणे जिल्ह्य़ातून ८० टक्के गुलाबाची आवक होते.

एका फुलाची किंमत १५ रुपये; उत्पादन घटल्याने दरांत वाढ

ऋषिकेश मुळे/आशीष धनगर, ठाणे

गुरू-शिष्य परंपरेचे प्रतीक म्हणून साजऱ्या होणाऱ्या गुरुपौर्णिमेला शिष्य, विद्यार्थी गुलाब पुष्प देऊन आपल्या गुरूंप्रति आदरभाव व कृतज्ञता व्यक्त करत असतात. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर गुलाबांचे दर वाढले आहेत. आठ दिवसांपूर्वी दहा रुपयांना मिळणारे गुलाबाचे एक फुल सोमवारी, गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला १५ रुपये दराने विकले जात होते. कडक उन्हाळय़ामुळे गुलाबाचे उत्पादन कमी झाल्यामुळे आवकही घटली आहे. परिणामी दर महागल्याचे कारण विक्रेते देत आहेत.

मुंबई, ठाण्याच्या बाजारांत पुणे जिल्ह्य़ातून ८० टक्के गुलाबाची आवक होते. गुलाबाच्या फुलांना नेहमीच चांगली मागणी असते. मात्र, गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुलाबपुष्प देऊन गुरूंना वंदन करण्याची प्रथा अनेक वर्षांपासून रूढ झाली असल्याने या दिवशी गुलाबाच्या मागणीत लक्षणीय वाढ होत असते. त्याचा परिणाम दरवाढीवर होत असतो. यंदाही तेच चित्र आहे. आठ दिवसांपूर्वी गुलाबाचे एक फूल दहा रुपयांमध्ये विकले जात होते. मात्र, गेल्या दोन दिवसांत हेच फूल १५ रुपयांमध्ये विकले जात आहे. गुरुपौर्णिमेमुळेच गुलाबाचे दर वाढल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, गुलाब महाग होण्यामागे वेगळेच कारण असल्याचा दावा गुलाब उत्पादकांनी केला आहे.

गुलाबाच्या झाडांना पॉली हाऊसमध्ये फुले येण्यासाठी साधारण दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो.  गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर फुलांचे अपेक्षित उत्पादन घेण्यासाठी मे महिन्यात बेन्डिंग प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. यंदाही शेतकऱ्यांनी अशी प्रक्रिया केली. मात्र, यंदाच्या मे महिन्यात कडक उन्हाच्या झळांमुळे ही प्रक्रिया अयशस्वी झाल्याने गुलाब उत्पादनात घट झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

बेन्डिंग प्रक्रिया म्हणजे काय?

गुलाबाच्या झाडाच्या कळ्यांवर कीटकांचा प्रादुर्भाव होतो. असे झाल्यास झाडांच्या कळ्या आणि फांद्या छाटण्यात येतात. त्यानंतर काही दिवस झाडाला वाकवून ठेवण्यात येते. झाड वाकविल्यानंतर झाडाला फुलांचा चांगला बहर येतो. या संपूर्ण प्रक्रियेसाठी साधारण दीड महिन्यांचा कालावधी लागतो, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

गुलाबाच्या फुलांचे चांगले उत्पादन यावे यासाठी बेन्डिंग प्रक्रिया करण्यात येते. अनेक शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया मे महिन्यात सुरू केली. मात्र, कडक उन्हाचा बेन्डिंग प्रक्रियेला फटका बसल्याने गुरुपौर्णिमेच्या काळात गुलाबाचे उत्पादन घटले आणि त्यामुळेच बाजारात गुलाबाचे भाव वधारले आहेत.

– किरण मुळे, गुलाब उत्पादक शेतकरी, तळेगाव ढमढेरे, पुणे

 

प्रकार                          आठवडय़ापूर्वी    सध्या

डच गुलाब दर्जा १           १००                  १५०

डच गुलाब दर्जा २            ९०                   १४०

डच गुलाब दर्जा ३            ८०                   १३०

तुकडा गुलाब                  १५०                  २००

(दर रुपयांत)

First Published on July 16, 2019 3:59 am

Web Title: rose prices hike on guru purnima occasion zws 70
Next Stories
1 निराशाग्रस्त व्यक्तीला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश
2 रस्ते अपघातात जीव गमावलेल्याच्या कुटुंबीयांना ९५ लाखांची भरपाई
3 शहरबात : ‘टीएमटी’समोर ‘बेस्ट’ पेच!
Just Now!
X