कामचुकार पालिका परिवहन कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश

कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयापाठोपाठ बुधवारी पहाटे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी ठाणे महापालिका परिवहनच्या (टीएमटी) वागळे आगाराला भेट देऊन कामाची पाहणी केली. अचानकपणे करण्यात आलेल्या या दौऱ्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांची एकच धावपळ झाली. या दौऱ्यादरम्यान कामावर गैरहजर असलेल्या कामचुकार अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी परिवहन व्यवस्थापकांना दिले आहेत.

गेल्या आठवडय़ात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये अचानकपणे पाहणी दौरा केला. त्या वेळी रुग्णालयातील विविध विभागांतील २३ डॉक्टर आणि त्यांचे सहयोगी डॉक्टर गैरहजर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. या प्रकरणी त्यांनी डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या दौऱ्यानंतर सुनील चव्हाण यांनी अशाचप्रकारे वागळे इस्टेट येथील परिवहन विभागाचाही पाहणी दौरा केला. यावेळी वाहतूक विभागाच्या कामाची पाहणी केली. त्या वेळी आगारातून चालक आणि वाहकांनी किती बसेस बाहेर काढल्या, याचाही आढावा त्यांनी घेतला. या आढाव्यादरम्यान त्यांना कामावर अनेक जण गैरहजर असल्याचे आढळले. या  गैरहजर असलेल्या कामचुकार अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर  त्याचवेळी कडक कारवाई करण्याचे आदेश सुनील चव्हाण यांनी परिवहन व्यवस्थापक संदीप माळवी यांना दिले.

पहाटे पाच वाजताच भेट

सुनील चव्हाण यांनी बुधवारी पहाटे पाच वाजता अचानकपणे टीएमटीच्या वागळे आगाराला भेट दिली. त्या वेळी त्यांच्यासोबत परिवहन सेवेचे प्रभारी व्यवस्थापक संदीप माळवी उपस्थित होते. या भेटीमध्ये त्यांनी वागळे आगारामधून सकाळच्या सत्रामध्ये किती बसेस बाहेर पडल्या आणि किती बसेस नादुरुस्त आहेत, याचा आढावा घेतला. तसेच बसेस कोणत्या कारणांमुळे नादुरुस्त आहेत, याचीही माहिती घेतली. तसेच आगारातील कार्यशाळेच्या कामाचीही पाहणी केली.