महाविद्यालयात येणाऱ्या तरुणांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये अभ्यासाबरोबरच अभ्यासायेत्तर उपक्रमांचा मोठा सहभाग असतो. नृत्य, नाटय़, अभिनय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम तरुणाईला घडवत असते. अशा उपक्रमात सहभाग नोंदवणारे तरुण ‘महाविद्यालयातील तारे’ म्हणून ओळख मिळत असतात. महाविद्यालयाचे शक्तिस्थान म्हणून या विद्यार्थ्यांकडे पाहिले जाते. ठाणे, कल्याणमधील विविध महाविद्यालयाच्या अशाच ताऱ्यांनी ‘लोकसत्ता ठाणे’च्या ‘कट्टा गोलमेज’ मध्ये उपस्थित राहून आपले अनुभव कथन केले. भविष्यात महाविद्यालयात येणाऱ्या तरुणांनी अभ्यासाशिवाय अन्य सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक उपक्रमात सहभागी घेऊन ‘महाविद्यालयाचे तारे’ होण्याचा नक्की प्रयत्न करण्याचे आवाहन या मंडळींनी केले.
कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयात आयोजित या ‘कट्टा गोलमेज’ साठी बेडेकर महाविद्यालयातील आंतराष्ट्रीय कथ्थक नृत्यांगणा पल्लवी लेले, मल्लखांबपटू किशोर म्हात्रे, ज्ञानसाधना महाविद्यालयाची किकबॉक्सिंगपटू कांचन सकुडे उपस्थित होते, तर बिर्ला महाविद्यालयातील नाटय़क्षेत्रातील संदेश पडवळ, एनएसएसमधील प्रणव आगाशे, वादविवाद स्पर्धेची विजेती रियांका मिश्रा, तायक्वांडोची खेळाडू अरुंधती देशपांडे, कुस्ती खेळाडू योगेश मडवी, नेमबाज भाग्यश्री भोईर, एनसीसीची राष्ट्रीय पुरस्कार विजेती अंजली सुरांजे, मिस्टर बिर्ला किताब विजेता अंकीत अगरवाल, एनएसएसमधील अनिरूद्ध चटला या ‘महाविद्यालयातील ताऱ्यांनी’ सहभाग नोंदवला होता. महाविद्यालयात अभ्यास करण्यासाठी जरी येत असलो तरी केवळ अभ्यास एके अभ्यास असे न करता इतर उपक्रमात तरुणांनी नेहमीच सहभागी होत राहणे गरजेचे आहे. आपल्याला आवडेल त्या क्षेत्रामध्ये जाण्याची आपली तयारी असणे गरजेचे आहे. स्पर्धा जिंकल्यानंतर मिळणारा मानसन्मान महत्त्वाचा असला तरी हे क्षणभंगूर आहे, याची जाणीव ठेवणे  गरजेचे आहे. अभ्यास करून महाविद्यालयात प्रवेश मिळवल्याशिवाय हा आनंद उपभोगता येत नाही. त्यामुळे ‘‘चांगला अभ्यास करा आणि महाविद्यालयाचे तारे होऊन चमका,’’ असा संदेश उपस्थित विद्यार्थ्यांनी यावेळी दिला.