उपमहापौर शिवसेनेसोबत तर पदाधिकारी भाजपसोबत गेल्याने आश्चर्य

उल्हासनगर : राज्यात रिपाइंचा आठवले गट भाजपसोबत असतानाही उल्हासनगर महापालिकेत धक्कातंत्राने महापौरपद मिळवणाऱ्या शिवसेनेने रिपाइंला आपल्यासोबत ठेवले आहे. मात्र, रिपाइं शहराध्यक्ष शिवसेनेसोबत असले तरी रिपाइंच्या काही जुन्या कार्यकर्त्यांनी नुकतीच भाजप आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आयोजित बैठकीस हजेरी लावली आहे. या बैठकीनंतर उल्हासनगर रिपाइंत फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

उल्हासनगर महापालिका निवडणुकांना वर्षभराचा कालावधी शिल्लक असतानाच शहरात राजकीय समीकरणांची मांडणी करण्यास राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एके काळचे कट्टर विरोधक ओमी कलानी आणि माजी आमदार ज्योती कलानी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर महापालिका निवडणुकीची तयारी सुरू झाल्याची चर्चा शहरात रंगली होती. उल्हासनगर महापालिकेचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेने भाजपतील टीम ओमी कलानी गटातील काही नगरसेवक फोडत शिवसेनेचा महापौर विराजमान केला. त्यानंतर झालेल्या स्थायी समिती निवडणुकीतही भाजप गटातील सदस्य फोडून शिवसेनेने स्थायी समिती मिळवली.

राज्यात शिवसेनेविरुद्ध असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाचे तीन नगरसेवक उल्हासनगरात मात्र शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे शिवसेना शहरात भाजपला कोंडीत पकडण्यासाठी तयारी करत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, नुकतेच भाजपचे आमदार कुमार आयलानी यांनी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत आपल्या कार्यालयात रिपाइंच्या जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांना व माजी नगरसेवकांना बैठकीसाठी आमंत्रण दिले होते. रिपाइंचे ज्येष्ठ पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनीही या बैठकीला हजेरी लावत आगामी महापालिका निवडणुकीसाठी चर्चा केली. या बैठकीनंतर उल्हासनगर रिपाइं आठवले गटात फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले

बैठकीचे समर्थन

रिपाइं आणि भाजप राज्यात तसेच केंद्रात सोबत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या तोंडावर बैठक आयोजित केली होती. पदाधिकारीही स्वेच्छेने बैठकीत उपस्थित झाले होते, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार कुमार आयलानी यांनी दिली आहे. तर बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांकडे कोणतेही पद नाही, अशी प्रतिक्रिया रिपाइंचे शहर अध्यक्ष आणि उपमहापौर भगवान भालेराव यांनी दिली आहे. त्याच वेळी आम्ही पक्षप्रमुख मंत्री रामदास आठवले यांच्या विचारांवर चालत असल्याचे सांगत बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांनी बैठकीचे समर्थन केले आहे.