दोन बसचालकांना उद्दाम रिक्षाचालकांकडून मारहाण झाल्यामुळे राज्याच्या परिवहन विभागाच्या वरिष्ठांनी कल्याण, भिवंडीतील उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक विभागाच्या वरिष्ठांना बेशिस्त रिक्षाचालकांना वठणीवर आणण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे ‘आरटीओ’ आणि वाहतूक अधिकाऱ्यांनी भिवंडी, कल्याण आगारांच्या बाहेर बेशिस्तपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांची तपासणी मोहीम सुरू केली होती. त्यामुळे बेशिस्त रिक्षाचालकांना चांगलाच धडा मिळाला..

कल्याण-डोंबिवली परिसरात अंतर्गत वाहतुकीचे अन्य सक्षम पर्याय उपलब्ध नसल्याने रिक्षाचालकांचे फावले आहे. मात्र त्यांनाही वठणीवर आणता येते, हे गेल्या आठवडय़ातील कारवाईने दिसून आले. कल्याणमध्ये ‘आरटीओ’, वाहतूक अधिकाऱ्यांनी आठवडाभर रिक्षा तपासणी मोहीम राबवून तब्बल २५०हून अधिक रिक्षांवर कारवाई केली. अशीच परिस्थिती भिवंडीची. रिक्षांची कागदपत्रे नाहीत, गणवेश नाही, ‘आरटीओ’चा बिल्ला नाही, आयुर्मान संपलेल्या रिक्षा चालविणे, असे प्रकार हे रिक्षाचालक करीत असल्याचे अधिकाऱ्यांच्या तपासणीत निष्पन्न झाले आहे. बसचालक या सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण झाली म्हणून सरकारी यंत्रणा कामाला लागली. मात्र तेच सामान्य प्रवासी याच रिक्षाचालकांच्या रिक्षांतून घर ते रेल्वे स्थानक व अन्य भागांत नियमित प्रवास करीत असतात. त्यांना दररोज कोणत्या समस्येला सामोरे जावे लागत असेल याचाही विचार यानिमित्ताने होणे गरजेचे आहे. परिवहनमंत्री आले. ३८ भंगार रिक्षा जाहीरपणे तोडल्या म्हणून बेकायदा रिक्षा, उर्मट चालकांचा प्रश्न सुटणारा नाही.

कल्याण उपप्रादेशिक परिवहन क्षेत्रात १८ हजार परवानाधारक रिक्षा आहेत. कल्याण, डोंबिवली शहरांमधील वस्ती वाढत आहे. शहराचे भौगोलिक क्षेत्र जसे विस्तारत आहे; त्या प्रमाणात रिक्षा व्यवसाय वाढत आहे. केडीएमटीची बससेवा लुळीपांगळी असल्यामुळे त्या लुळेपणाचा पुरेपूर लाभ रिक्षाचालक घेत आहेत. रिक्षा व्यवसायाला समांतर अशी कोणतीही सक्षम सरकारी सार्वजनिक वाहतुकीची सुविधा शहरात नाही. त्यामुळे प्रवाशांना रिक्षा प्रवासावर अवलंबून राहावे लागते. सुरुवातीच्या काळात उपजीविकेचे साधन म्हणून प्रामाणिकपणे रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करणारे रिक्षाचालकांचे संघटन करून त्यांचे नेते झाले. रिक्षाचालकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध या मंडळींनी वेळोवेळी आवाज उठविला. नेते मोठे झाले. रिक्षा चालविण्याचा व्यवसाय बंद करून वातानुकूलित खोलीत बसून रिक्षा व्यवसायाचे नियंत्रण करू लागले. काही लोकप्रतिनिधी झाले. आपण काही केले तरी आपला नेता आपल्याला आरटीओ, वाहतूक  पोलिसांच्या कारवाईतून सहीसलामत सोडवू शकतो याची जाणीव झाल्याने हळूहळू रिक्षाचालक मनमानी करू लागले. या सगळ्या व्यवस्थेला रिक्षा संघटनेच्या नेत्यांकडून चालकांना पाठबळ मिळत गेले. रिक्षा वाहनतळांवरील रिक्षाचालकांकडून नियमितची होणारी वसुली संघटना नेत्यांच्या घरपोच जाऊ लागली आणि आताही घरपोच होतेच. आपण जी दररोजची ‘दक्षिणा’ रिक्षा संघटना नेत्याच्या समर्थकाकडे देतो; त्या दक्षिणेच्या माध्यमातून आपण काहीही करायला मोकळे, असा एक समज रिक्षाचालकांमध्ये दृढ होत गेला. तो आता इतका वाढला आहे की एकेका रिक्षाचालकाच्या चार ते पाच रिक्षा आहेत. त्यामधील दोन आरटीओ परवानाधारी तर उर्वरित भंगार (आयुर्मान संपलेल्या). एकीकडे रिक्षाचालकांचा हा बेनामी व्यवहार, तर रिक्षा चालविण्याच्या खुर्चीपासून दूर गेलेले पण नेतेगिरीत व्यस्त असलेले रिक्षाचालकांचे नेते आता रिक्षातील आसनावर बसायला तयार नाहीत. या मंडळींनी आपल्या हक्काच्या रिक्षा, त्याचबरोबर परवाना नसलेल्या बेनामी रिक्षांच्या माध्यमातून आपले प्रवासी वाहतुकीचे बेकायदा व्यवसाय सुरू ठेवले आहेत.

‘आरटीओ’, वाहतूक पोलिसांना हे सगळे माहिती आहे पण बोलणार कोण, राजकीय नेत्याशी पंगा घेणार कोण, असे प्रश्न अधिकाऱ्यांसमोर असतात. शहरात नोकरीची तीन वर्षे घालवायची असतात. त्यामुळे अधिकारी बेशिस्त रिक्षाचालकांवर, त्यांच्या भंगार रिक्षांवर कारवाई करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. नंदकिशोर नाईक यांच्यासारखे काही आरटीओ अधिकारी सोडले तर, वाहतूक व इतर कोणी अधिकारी असेल तर तडजोडीची खेळी करून या बेकायदा रिक्षा व्यवसायांच्या ‘मोहात’ अडकतो. आता तेच सुरू आहे. ‘लोकसत्ता ठाणे’कडे डोंबिवलीत पश्चिमेत सुरू असलेल्या २५० भंगार रिक्षाचालकांची यादी आहे. त्यातील ४०हून अधिक रिक्षा गेल्या वर्षी आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडल्या आहेत.

शहरातील वाहतुकीचे नियमन करण्याचे काम वाहतूक विभागाचे असते. या अधिकाऱ्यांना वर्षांचा महसुली लक्ष्यांक वरिष्ठांकडून दिला जातो. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी वाहतूक विभागाचे कर्मचारी वाहतूक नियोजनापेक्षा अलीकडे वसुलीत अधिकव्यस्त असतात. वाहतूक पोलिसांच्या नजरेत रिक्षाचालक नियमित असतात. वाहतूक पोलिसांनी आठवडय़ातून किमान दोन वेळा वाहतूक नियमनाबरोबर रिक्षाचालकांचे कागद, त्यांच्या बेशिस्तपणाबद्दल चौकशी केली तरी रिक्षाचालक ताळ्यावर येऊ शकतात. मात्र अलीकडे वाहतूक विभागाचा तेवढा वचक राहिलेला नाही. कल्याण, डोंबिवलीतील रस्ते ३५०हून अधिक किलोमीटर लांबीचे आहेत. त्यात वाढलेली दामदुप्पट वाहने. चौकाचौकातील कोंडी सोडविण्यासाठी आवश्यक वाहतूक कर्मचारी कल्याण-डोंबिवली शाखांकडे नाही. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत ‘रेटणे’ एवढेच काम शहरांमध्ये सुरू असल्याने वाहतूक कोंडी, बेशिस्त रिक्षाचालकांची मनमानी हे प्रकार सुरू आहेत.