उपप्रादेशिक विभागाचा वाहतूक परवाना न घेताच अनेक वाहन मालक विद्यार्थ्यांची बस, ओमनी वाहनांमधून वाहतूक करीत असल्याने उपप्रादेशिक विभागाने कल्याण-डोंबिवलीतील विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसची तपासणी सुरू केली आहे. मंगळवारी डोंबिवलीच्या मुख्य रस्त्यांवर परिवहन अधिकाऱ्यांनी बस थांबून चालकांकडील बसच्या कागदपत्रांची तपासणी केली. तपासणी करताना विद्यार्थ्यांना शाळेत उशीर होणार नाही. त्यांची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने बस, वाहनांची तपासणी अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. मोटार वाहन निरीक्षक संतोष कातर, संदीप निमसे, मधुकर तांबे यांचे पथक ही तपासणी करीत आहेत.
ओमनीचालक गायब
आरटीओ अधिकारी रस्तोरस्ती विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या ओमनी, रिक्षा, बसची तपासणी करीत असल्याने परवाने नसलेल्या ओमनी, रिक्षाचालकांनी सोमवारपासून विद्यार्थ्यांच्या पालकांना आरटीओ अधिकाऱ्यांची तपासणी पूर्ण होईपर्यंत मुलांना शाळेत पोहचविणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे पालक वर्गाची तारांबळ उडाली आहे. अनेक ओमनीचालक आरटीओच्या जाळ्यात पुन्हा फसायला नको म्हणून शहरांचे कोपरे, गल्लीबोळ गाठून आपली वाहने उभी करून आहेत. आरटीओ अधिकारी दोन दिवस शहरात असल्याने भंगार रिक्षाचालक गायब झाले आहेत. हे चालक रेल्वे प्रवेशद्वार, मुख्य रस्ते अडवून व्यवसाय करीत असतात. आरटीओ अधिकाऱ्यांनी अशा प्रकारची नियमित तपासणी केली तर शहरातील बेकायदा प्रवासी वाहतूक करणारे रिक्षाचालकही गायब होतील, अशा प्रतिक्रिया रहिवाशांकडून देण्यात येत आहेत. आरटीओ अधिकारी सोमवार, मंगळवार डोंबिवलीत असल्याने भंगार रिक्षाचालक रेल्वे स्थानक परिसरात दिसत नव्हते.