भाडे नाकारणे, रिक्षाचे कागद जवळ न ठेवणे, वयोमर्यादा उलटूनही त्या रिक्षाचा वापर करणे, नियमांचे पालन न करणे अशा विविध कायद्यांखाली कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर परिसरातील रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे. गेल्या चार महिन्यांत ३६३ रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. ९५ चालकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार नाईक यांनी दिली.
रिक्षाचालकांच्या संदर्भात प्रवाशांच्या नियमित तक्रारी येत असतात. या तक्रारींची दखल घेतली जाते. सरसकट सर्वच रिक्षाचालकांची कागदपत्रे, परवाने, ते गणवेशात असतात की नाही याची तपासणी करावी म्हणून उपप्रादेशिक परिवहन विभागाने ही मोहीम हाती घेतली आहे. अनेक रिक्षाचालक वयोमर्यादा संपलेली रिक्षा घेऊन वाहनतळ सोडून व्यवसाय करतात. त्यामुळे प्रामाणिक रिक्षाचालकांवर अन्याय होत असतो. ते प्रकार बंद व्हावेत या उद्देशातून ही मोहीम तीव्र केली आहे, असे आरटीओ नाईक यांनी सांगितले.बनावट नोंदणी केलेली डोंबिवलीतील आठ वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. वाहतूक विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त तपासणीत ही वाहने आढळून आली आहेत. या वाहनांची नोंदणी रद्द करून त्यांचा रामनगर पोलीस चौकी येथे लिलाव करण्यात येणार आहे.

रिक्षाचालकांवर करण्यात येणाऱ्या कारवाईतून ४ लाख ९४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. न्यायालयीन दंड म्हणून १३ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत.
– नंदकुमार नाईक,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी