गैरप्रकार टाळण्यासाठी प्रशासन सज्ज; सांस्कृतिक कार्यक्रम, मद्याचा परवाना बंधनकारक

नाताळ आणि नववर्षांच्या स्वागतासाठी सर्वत्र तयारी सुरू झाली असून गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनही सज्ज झाले आहे. नववर्ष पाटर्य़ासाठी अनेक नियमांचे बंधन असतानाही ते कुणीच पाळत नसल्याचे चित्र असते. मात्र यंदा नियमांचे बंधन कडक केले असून त्यांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

नवीन वर्षांचे स्वागत आणि नाताळ सणाचे औचित्य साधून ठिकठिकाणी पार्टी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र असे कार्यक्रम परवानग्या न घेता केले जात असल्याचे आढळून आले आहे. ध्वनिप्रदूषण तसेच वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन होते, तसेच शासनाचा महसूलही बुडत असतो. त्यामुळे या वर्षी जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक मनोरंजनाच्या कार्यक्रमांसाठी पूर्वपरवागनी बंधनकारक केली आहे. संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांकडे अर्ज आणि शुल्क भरून ही परवानगी घेता येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी संभाजी अडकुणे यांनी सांगितले आहे. परवानगी न घेता कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य पार्टीसाठीही परवान्याची सक्ती केली आहे. या काळात होणाऱ्या गावठी दारूचा वापर लक्षात घेता ठिकठिकाणी छापे टाकून हातभट्टय़ांच्या दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले जात आहेत.

हे नियम बंधनकारक

  • नाताळ, नववर्ष स्वागतासाठी करमणूक कार्यक्रम असेल, तर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक.
  • करमणुकीच्या कार्यक्रमाचा कर भरणे आवश्यक.
  • मद्य पार्टीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची परवानगी सक्तीची.
  • गच्चीवरील मद्य पार्टीसाठीही आयोजकांकडे मद्याचा परवाना आवश्यक.

लाखो लिटर गावठी दारू नष्ट

या काळात मद्याची मागणी लक्षात घेता मोठय़ा प्रमाणावर भेसळयुक्त मद्याचा पुरवठा होत असतो. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य उत्पादक शुल्क विभाग सक्रिय झाला आहे. गेल्या महिन्याभरापासून वसई-विरारसह पालघर जिल्ह्याच्या विविध भागांतील गावठी हातभट्टय़ांच्या अड्डय़ांवर छापे टाकण्यात येत आहेत.

मागील एक महिन्यात किमान २५ गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले असून लाखो लिटर गावठी दारू जप्त रून ती नष्ट केल्याची माहिती राज्य उत्पादक शुल्क विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोरे यांनी दिली आहे.

गच्चीवरील पार्टीसाठीही परवाना आवश्यक

पार्टीसाठी परवानगी आवश्यक असली तरी जिथे मद्यपान होणार आहे, अशा प्रत्येक ठिकाणी मद्याचा परवाना बाळगणे आवश्यक असल्याचे राज्य उत्पादक शुल्क विभागाने सांगितले आहे. अगदी घराच्या गच्चीवर जरी मद्य-पार्टी असेल तरी आयोजकाने मद्याचा परवाना आणणे आवश्यक आहे. असा परवाना न बाळगणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. मद्य पिण्यासाठी परवाना घ्या, असे आवाहन राज्य उत्पादक शुल्क विभागाने केले असून एकदिवसीय परवाना सर्व विभागीय कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.