बदलापूरमध्ये तहसीलदारांच्या समोरच पूरग्रस्तांना पदाधिकाऱ्यांकडून धनादेश वाटप

बदलापूर : गेल्या महिन्यात बदलापूर शहरात आलेल्या पुरामुळे नागरिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल्यानंतर शासनाकडून आता त्यांना आर्थिक मदतीचे वाटप केले जात आहे. मात्र या वाटपाच्या कार्यक्रमात सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांना प्रसिद्धीचा हव्यास आहे.

शासनाच्या धनादेशाचे वाटप करत प्रसिद्धी मिळवण्याचा हा प्रकार असल्याची टीका करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तहसीलदारांसह इतर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.  २६ आणि २७ जुलै रोजी आणि त्यानंतर ३ आणि ४ ऑगस्ट रोजी बदलापूर शहरात पूर आला होता. या पुरामुळे सुमारे सहा हजार नागरिकांचे नुकसान झाले आहे. मात्र शासनाच्या ४८ तासांच्या अटीमुळे केवळ अडीच हजार कुटुंबांना या मदतीचा फायदा घेता येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे तहसील कार्यालयात मदत पोहोचविण्यात आली आहे. या शासकीय मदत वाटपात सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक तसेच पदाधिकारी झळकत असल्याचे समोर आले आहे. ज्या रहिवासी संकुलात पुराचे पाणी शिरले होते, त्या संकुलात भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर कार्यक्रम घेत धनादेशाचे वाटप केले.

राजकीय फायद्यासाठी भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकारी धनादेशाचे वाटप करत प्रसिद्धी मिळवत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांनी केला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केल्याचे देशमुख यांनी सांगितले.  अंबरनाथचे तहसीलदार जयराज देशमुख यांना विचारले असता, शासकीय कर्मचाऱ्यांनी वाटप केलेले धनादेश घेऊन नगरसेवक पुन्हा वाटप करत छायाचित्र काढल्याचे त्यांनी सांगितले.