15 July 2020

News Flash

आयुक्तांच्या अजब निर्णयाला विरोध

सत्ताधारी अनभिज्ञ, भाजपची टीका

संग्रहित छायाचित्र

सत्ताधारी अनभिज्ञ, भाजपची टीका

ठाणे : ठाणे शहरात करोना बाधितांचा आकडा दिवसागणिक वाढू लागला असताना शहरातील गृहनिर्माण संस्थांनीच यापुढे संकुलांमधील क्लब हाऊस, बहुउद्देशीय सभागृहात अलगीकरण केंद्र तयार करावे या ठाणे महापालिका आयुक्तांच्या अजब आदेशावर सत्ताधारी शिवसेनेसह शहरातील राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महापालिकेच्या या आदेशाला ठाणे हाउसिंग फेडरेशनकडून विरोध करण्यात आला असून क्लब हाऊसमध्ये अलगीकरण केंद्र उभारण्याचे बंधन म्हणजे निव्वळ मुर्खपणा या शब्दात भाजपच्या नेत्यांनी या आदेशाची खिल्ली उडवली आहे. सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांनी जाहीरपणे याविषयी मत प्रदर्शन व्यक्त करणे टाळले असले तरी पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी या निर्णयावर नाराज असल्याचे सुत्रांनी सांगितले.

ठाणे शहरात करोना बाधितांचा आकडा वाढू लागल्याने संशयीत आणि कोणतेही लक्षणे नसलेल्या रुग्णांची व्यवस्था पहाताना महापालिका प्रशासनाचे पितळ उघडे पडू लागले आहे. केंद्र सरकारने मध्यंतरी एका आदेशान्वये कोणतेही लक्षण नसलेल्या करोना बाधित रुग्णांनी घरातच स्वतचे अलगीकरण करावे अशा सूचना देण्यात आल्या होत्या. असे असताना ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी मंगळवारी एक आदेश काढत लक्षणे नसलेल्या करोना बाधितांचा भार वसाहतींवर टाकल्याने गृह निर्माण संस्थांचे पदाधिकाऱ्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

गृहनिर्माण संस्थाही नाराज

वसाहतींमधील या अलगीकरण केंद्रात रुग्णांना चहा, नाश्ता आणि भोजन पुरविण्याची जबाबदारी रुग्णांच्या नातेवाईकांवर तर सेंटरची साफसफाई, बायोमेडीकल कचरा, गृहसंकुलातील डॉक्टरांची नेमणूक करणे, अशी जबाबदारी पदाधिकाऱ्यांच्या माथी मारण्यात आली आहे. गृहसंकुलात डॉक्टर उपलब्ध नसतील तर महापालिकेकडून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या डॉक्टरांचे मानधन देण्याची जबाबदारी रुग्ण, त्याचे कुटुंब आणि गृहसंकुलांच्या पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या निर्णयास ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनने कडाडून विरोध केला असताना शहरातील राजकीय पक्षही आयुक्तांच्या या अजब फतव्यावर तुटून पडले आहेत. अलगीकरण केंद्राचा भार वसाहतींवर टाकणे म्हणजे निव्वळ मुर्खपणा असून हे असले सल्ले आयुक्तांना देतो तरी कोण, असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी केला आहे.दरम्यान, ताळेबंदीच्या काळात असे आदेश काढण्यापेक्षा गृहनिर्माण संस्थांना विश्वासात घेऊन मदत करण्याचे आवाहन आयुक्तांनी करायला हवे होते, अशी प्रतिक्रिया ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे यांनी पत्रकारांना दिली.

पालकमंत्री अंधारात?

करोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी ठाणे महापालिकेने सुरू केलेल्या प्रयत्नांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची पुरेपूर साथ मिळत आहे. शिंदे यांनी महापालिका मुख्यालयात यासंबंधी बैठकांचा सपाटा लावला आहे. असे असताना गृहनिर्माण संस्थांना या कामात जुंपताना पालकमंत्री वा महापौर यांसारख्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेण्यात आलेले नाही, अशी प्रतिक्रिया पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 3:16 am

Web Title: ruling shiv sena bjp opposing the strange decision of thane municipal commissioner zws 70
Next Stories
1 पिकपाण्याविषयी ऑनलाइन मार्गदर्शन
2 गोदामांमधील रुग्णालयांचा प्रस्ताव बारगळणार?
3 कचऱ्यामुळे ‘साथीं’ना निमंत्रण
Just Now!
X