मीरा-भाईंदर महापालिकेकडून विशिष्ट धर्मीयांचे समुपदेशन

बालकांमधील मृत्यूचे आणि आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकार मिशन इंद्रधनुष ही लसीकरण मोहीम राबवत आहे. परंतु या लसीकरणामुळे मुले नपुंसक होतील, असा गैरसमज एका विशिष्ट धर्मीयांमध्ये पसरला असल्याने लसीकरण मोहिमेचे १०० टक्के उद्दिष्ट प्राप्त करण्यात मीरा-भाईंदर महानगरपालिका असफल ठरत आहे.

लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांसाठी आणि गरोदर मातांसाठी मीरा-भाईंदर महापालिका शासनाची विशेष इंद्रधनुष मोहीम राबवत आहे. नियमित लसीकरण करून पूर्ण संरक्षित बालकांचे प्रमाण २०१८ पर्यंत नव्वद टक्क्यांहून अधिक करण्याचे उद्दिष्ट महापलिकेसमोर आहे. परंतु आतापर्यंत केवळ ७६ टक्के बालकांचेच लसीकरण करण्यात महापालिकेला यश मिळाले आहे. शिल्लक राहिलेल्या बालकांचे पालक एक तर महापालिका प्रशासनाकडून बालकांना लस देण्यास स्पष्टपणे नकार देत आहेत किंवा प्रशासनाला खोटी माहिती देऊन लस घेत नसल्याचे समोर आले आहे.

मीरा-भाईंदरमधील एका विशिष्ट धर्मीयांमध्ये या लसीकरणाबाबत तीव्र गैरसमज निर्माण झाले आहेत. आपल्या बालकाला ही लस दिली तर ते कायमचे नपुंसक होतील, अशी जोरदार चर्चा या धर्मीयांमध्ये सुरू आहे. या धर्मीयांचे वास्तव्य असलेल्या परिसरातच लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. अनेक वेळा प्रशासनाकडून लसीकरण करण्यासाठी त्यांची मिनतवारी केली जात आहे, वेळप्रसंगी बालकाच्या भविष्यासाठी पाणी तोडण्याची भीतीदेखील दाखवली जात आहे. परंतु हे पालक आपल्या निर्णयावर ठाम आहेत. ही लस शून्य ते दोन या वयोगटातील बालकांना द्यायची असते. त्यामुळे आमचे बालक दोन वर्षांवरील आहे, त्याला अगोदरच लस दिली आहे, आम्ही खासगी दवाखान्यात लस दिली आहे, अशी विविध कारणे पालकांकडून देण्यात येत आहेत. त्यामुळेच लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी काय करायचे, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा आहे. दोन दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाने या धर्मातील प्रमुख धर्मगुरूंचीदेखील बैठक घेतली आणि समाजातील पालकांचे लसीकरणाबाबत प्रबोधन करण्याचे आवाहन केले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी दिली.

प्रशासनाकडून आवाहन

प्रशासनाने ऑगस्ट ते ऑक्टोबर या दरम्यान केलेल्या सर्वेक्षणात २६८८ बालकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यातील १५९१ बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे. शिल्लक राहिलेल्या १०९७ बालकांमध्ये बाहेरून आलेल्या २६३ नव्या बालकांची भर पडली. एकंदर १३६० बालकांपैकी आतापर्यंत ७६ टक्के बालकांना लसीकरण करण्यात आले आहे. सर्वेक्षण करण्यात आलेल्या गरोदर मातांपैकी ८६ टक्के मातांनाही लस देण्यात आली आहे. आता ७ ते १४ नोव्हेंबरदरम्यान लसीकरणाची ९३ सत्रे आयोजित करण्यात आली आहेत, अशी माहिती महापालिकेच्या डॉ. अंजली पाटील यांनी दिली. सर्व नागरिकांनी स्वयंसेवी संस्था, सर्व राजकीय पक्ष, संघटना, खासगी वैद्यकीय व्यावसायिक, शिक्षण संस्था आदींनी बालके आणि गरोदर माता यांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुलांचे आयुष्य निरोगी जावे यासाठी लसीकरण मोहीम असते. त्यामुळे कोणतीही शारीरिक अथवा मानसिक हानी होती नाही. लसीकरणामुळे मूल नपूंसक होते, याबाबत कोणताही वैद्यकीय पुरावा नाही. हा केवळ गैरसमज असून त्यासाठी जनजागृती गरजेची आहे.

डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त, आरोग्य विभाग