ठाणे जिल्ह्यात केवळ १२ केंद्रांवरच लसीकरण सुरू; अ‍ॅपवरून तारखा मिळत नसल्याने तरुणवर्ग हैराण

ठाणे : जिल्ह्यात करोना प्रतिबंधक लशींच्या तुटवड्यामुळे अनेक लसीकरण केंद्रे बंद असून केवळ १२ केंद्रांवरच लसीकरण सुरू आहे. या केंद्रांवरही कोविन अ‍ॅपवर नोंदणी केलेल्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनाच लस दिली जात आहे. मात्र, नवी मुंबई वगळता इतर ठिकाणी पुढचे काही दिवस आगाऊ नोंदणी झालेली असल्याचे अ‍ॅपवर दाखविण्यात येत असून लसीकरणासाठी तारखा मिळत नसल्यामुळे अनेक तरुणांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. तर, दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकही दुसरा डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांच्या शोधात फिरत असून यातून मंगळवारी जिल्हा शासकीय रुग्णालयाबाहेरील केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांची गर्दी होऊन गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

देशातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे १ मेपासून लसीकरण सुरू करण्याची घोषणा केंद्र शासनाने केली होती. त्यानुसार राज्य शासनाने या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू केले आहे. असे असले तरी ठाणे जिल्ह्यात लस तुटवड्यामुळे अनेक लसीकरण केंद्रे बंद असून सद्य:स्थितीत जिल्ह्यात १२ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. लोकसंख्येच्या मानाने ही केंदे्र अपुरी आहेत. त्यातच या केंद्रांवर दिवसाला लसीकरणाचा कोटा ठरवून दिला जात असून त्यानुसार दिवसाला ठरवून दिलेल्या कोट्याप्रमाणेच लसीकरण होत आहे. या मर्यादेमुळे अनेक जण लशीच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी कोविन अ‍ॅपवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. या अ‍ॅपवर लसीकरणाची तारीख आणि ठिकाण निवडून नोंद करावी लागते. पण, नवी मुंबई वगळता अन्य ठिकाणी आगाऊ नोंदणी झाल्याचे अ‍ॅपवर दिसून येत आहे. या आगाऊ नोंदणीमुळे अनेकांना लसीकरणासाठी तारखा मिळत नसून यामुळे ते लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच या प्रक्रियेविरोधात तरुणांमधून नाराजाचा सूरही उमटत आहे.

सद्य:स्थितीत जिल्ह्यात सुरू असलेल्या केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातील सुमारे ३ हजार नागरिकांचे दिवसाला लसीकरण होत आहे. मात्र, जिल्ह्यातील लोकसंख्येच्या  तुलनेने हे प्रमाण अत्यंत कमी आहे. ठाण्यातील ग्लोबल रुग्णालयात या वयोगटातील नागरिकांसाठी केवळ १५०० डोस शिल्लक राहिले आहेत. हा साठा येत्या पाच दिवसांत संपेल असे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. कल्याण येथील लाल चौकीमधील आर्ट गॅलरी केंद्रावरही नागरिकांची झुंबड उडाल्याचे चित्र होते. पुरेसे नियोजनही या ठिकाणी करण्यात आले नव्हते. भिवंडीत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी दोनच केंद्रे सुरू असून या ठिकाणीही लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. ग्रामीण भागातही दिवसाला सरासरी १०० जणांचे लसीकरण होत आहे. उल्हासनगरमध्येही केवळ एकच लसीकरण केंद्र सुरू आहे. तर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात लसीकरण केंद्र नसल्यामुळे येथील नागरिक ठाणे तसेच इतर शहरातील केंद्रांवर लस मिळविण्यासाठी प्रयत्ना करीत असल्याचे चित्र आहे.

केंद्रांवर गोंधळ

करोना प्रतिबंधक लशीचा दुसरा डोस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाबाहेर मोठ्या संख्येने मंगळवारी जमले होते. या नागरिकांची रांग उथळसर प्रभाग समितीपर्यंत गेली होती. केवळ ४०० लशींचा साठा शिल्लक असल्याचे सांगत रुग्णालय प्रशासनाने ४०० नागरिकांना केंद्रात प्रवेश दिला. त्यामुळे उर्वरित नागरिकांनी याठिकाणी गोंधळ घातला. तर, कल्याण शहरातही अशीच परिस्थिती होती. दरम्यान, राम मारुती रोड परिसरात राहणाऱ्या एक ५८ वर्षीय महिलेने सांगितले, ‘कुठल्याच केंद्रावर लस मिळत नव्हती. माझ्या मुलीने सोमवारी लस उपलब्ध होईल का, अशी विचारणा जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वार असलेल्या कर्मचाऱ्यांकडे केली. त्यावेळी मंगळवारी सकाळी रांगा लावा असे त्यांनी तिला सांगितले. त्यामुळे आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून रांग लावली होती. मात्र, केवळ ४०० डोस शिल्लक असल्याचे सांगत रुग्णालय प्रशासनाने तितक्याच नागरिकांना केंद्रात प्रवेश दिला. चार तास उन्हात उभे राहूनही आमचे कोणीही ऐकून घेतले नाही.’