मरावे परि अवयवरूपी उरावे’ असा संदेश देणारा गणेशोत्सव साकारणाऱ्या महागिरी कोळीवाडा परिसरातील गणेशोत्सव मंडळाच्या उपाध्यक्षांनी स्वत:च्याच कृतीतून हा संदेश खरा करून दाखवला आहे. या मंडळाचे उपाध्यक्ष असलेल्या रूपेश भोईर यांच्या पत्नी सांकिका यांचे मंगळवारी आकस्मिक निधन झाले. मात्र, अशा शोकमग्न अवस्थेतही रूपेश यांनी सांकिका यांचे नेत्रदान करून आपल्याच मंडळाचा संदेश अधोरेखित केला.

गणेशोत्सवात महागिरी कोळीवाडा मंडळाने अवयवदान चळवळीतील एक कार्यकर्ते विलास ढमाले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मरावे परि अवयवरूपी उरावेअसा संदेश देणारा देखावा साकारला होता. परिसरातील नागरिकांकडून अवयवदानाबाबत अर्जही भरून घेण्यात आले होते. या मोहिमेत सांकिका यांनी स्वत: अर्ज भरलाच, शिवाय त्यांच्या प्रयत्नांमुळे पन्नासेक महिलांनी अवयवदानाचे अर्ज भरले. मात्र, दुर्दैवाने अनंत चतुर्दशीनंतर अवघ्या दोनच दिवसांनी मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने सांकिका यांचे निधन झाले. या अकल्पित घटनेने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगरच कोसळला. मात्र त्याही परिस्थितीत सांकिका यांची नेत्रदान करण्याची अखेरची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. तातडीने संबंधित यंत्रणेला कळविण्यात आले आणि रात्री दीड वाजता तिचे नेत्र सुखरूपरीत्या पेढीत नेण्यात आले.