कल्याणपल्याडच्या रेल्वे स्थानकांची अवस्था बिकट

मध्य रेल्वेच्या खडवली, कसारा, वांगणी आणि नेरळ या स्थानकांतील गर्दी दिवसागणिक वाढत आहे. असे असले तरी या रेल्वे स्थानकांमध्ये केवळ एकच पादचारी पूल असल्याने रेल्वे स्थानकांतील बहुसंख्य प्रवासी रेल्वे रूळ ओलांडून जीवघेणा प्रवास करीत असल्याचे चित्र आहे. तसेच अनेक रेल्वे स्थानकांतील पुलांची कामे धिम्या गतीने सुरू असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

मुंबई उपनगरांतील घरांचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने अनेक कुटुंबे कल्याणपल्याडच्या शहरांमध्ये वास्तव्यास जाऊ लागली आहेत. त्यामुळे कल्याणपुढील शहाड, आंबिवली, टिटवाळा, अंबरनाथ आणि बदलापूर या भागाचे झपाटय़ाने नागरीकरण झाले. येथील खडवली, कसारा, वांगणी आणि नेरळ या ठिकाणी स्वस्त दरातील नवी गृहसंकुले उभी राहू लागली आहेत. त्यामुळे या भागात लोकसंख्या वाढू लागल्याने तेथील रेल्वे स्थानकांमधील पायाभूत सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. खडवली रेल्वे स्थानकात असंख्य प्रवासी हे रूळ ओलांडून प्रवास करतात. याच मार्गावरील कसारा हे स्थानक महत्त्वाचे जंक्शन आहे. या स्थानकात लांब पल्ल्याच्या गाडय़ा थांबतात. या स्थानकातूनच दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. तसेच स्थानकाला रेल्वे प्रशासनातर्फे  ‘अ’ स्थानकाचा दर्जा देण्यात आला असला तरी रेल्वे स्थानकाची अवस्था अत्यंत बिकट आहे. या स्थानकात एकच अरुंद पूल असून या पुलावरून प्रवाशांना मार्ग काढावा लागतो.

कसारा स्थानकात मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून आणखी एका पुलाला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, अद्याप कामाला सुरुवातच झालेली नाही. त्याचबरोबर कल्याण-कर्जत मार्गावरील वांगणी आणि नेरळ रेल्वे स्थानकातही अशीच परिस्थिती आहे. वांगणी आणि नेरळ परिसरात मोठी गृहसंकुले उभी राहत आहेत. बदलापूरच्या तुलनेत या गृहसंकुलांची किंमत कमी असल्याने या दोन्ही ठिकाणची लोकवस्ती वाढू लागली असून नेरळ स्थानकातून माथेरान या पर्यटन स्थानकात जाण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पर्यटकही येत असतात. मात्र, या दोन्ही स्थानकांमध्येही केवळ एकच पादचारी पूल असल्याने असंख्य प्रवासी जीव धोक्यात घालून रूळ ओलांडत आहेत.

खडवली, कसारा, वांगणी आणि नेरळ या स्थानकांमध्ये गर्दी वाढली असेल आणि जर तेथे एकच पादचारी पूल असेल तेथे लवकर तेथे नव्याने पूल बांधण्यात येतील, अशी माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

नियोजन फसले

शहाड रेल्वे स्थानकात मध्य रेल्वेतर्फे दोन पादचारी पूल उभारण्यात आले असले तरी हे दोन्ही पूल मुंबईच्या दिशेने उभारण्यात आले आहेत. त्यामुळे स्थानकातून कसारा दिशेकडे राहणारे नागरिक मोठय़ा प्रमाणात रूळ ओलांडतात.

कामे धिम्या गतीने

मध्य रेल्वेच्या टिटवाळा आणि आसनगाव स्थानकात प्रत्येकी दोन पादचारी पुलांची कामे सुरू आहेत. मात्र, या कामांची गती धिमी असल्याने पादचाऱ्यांना केवळ एकच पादचारी पुलाचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे सकाळ आणि सायंकाळच्या वेळी या ठिकाणी मोठी गर्दी उसळते.

मध्य रेल्वेच्या कल्याणपल्याडच्या रेल्वे स्थानकांमध्ये गर्दी वाढत असून तेथील सुविधा अजूनही अपुऱ्या आहेत. खडवली, कसारा, वांगणी आणि नेरळ या स्थानकांमध्ये केवळ एकच पादचारी पूल असल्याने प्रवासी धोकादायक पद्धतीने रूळ ओलांडतात. – राजेश घनघाव, अध्यक्ष, कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटना