वितरण व्यवस्थेत अडथळे; समूहाने भाजीखरेदी करण्याचे आवाहन

आशीष धनगर, लोकसत्ता

ठाणे : भाजी मंडईमध्ये होणाऱ्या ग्राहकांच्या गर्दीमुळे करोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता गृहीत धरून ठाणे महापालिकेने संकेतस्थळाद्वारे भाजीविक्रीची योजना आखली. मात्र, या संकेतस्थळावर प्रत्येक ग्राहक स्वतंत्र नोंदणी करत असल्याने त्यानुसार भाजीपाल्याचा पुरवठा करताना संकेतस्थळ व्यवस्थापनाची दमछाक होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी वैयक्तिक नोंदणी न करता एखाद्या गृह संकुलाने सामूहिकपणे भाजीपाल्याची मागणी नोंदवावी, असे आवाहन संकेतस्थळ व्यवस्थापनाने केले आहे.

जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिक बाजारपेठांमध्ये मोठय़ा प्रमाणात गर्दी करत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे करोना विषाणू संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही गर्दी टाळण्यासाठी ठाणे शहरात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महापौर नरेश म्हस्के यांच्या सहकार्याने शेतातील ताजा भाजीपाला वाजवी दरात थेट इमरतीपर्यंत पोहोचवण्यासाठी मी मराठी प्रतिष्ठान आणि क्रक्स रिस्क मॅनेजमेंट प्रा.लि. यांच्या माध्यमातून संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून ठाणेकरांना भाजीपाला आणि फळे वाजवी दरात इमारतीच्या प्रवेशद्वारावर विकत घेता येत आहे. या संकेतस्थळावर भाजी खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत असून दररोज ३०० ते ४०० नागरिक या संकेतस्थळाच्या माध्यमातून भाजी खरेदी करत आहेत. असे असले तरी प्रत्येक नागरिक भाजी खरेदी करण्यासाठी स्वतंत्र नोंदणी करत असल्याने संकेतस्थळ व्यवस्थापनावरील ताण वाढत आहे. या संकेतस्थळावर नागरिकांनी खरेदी केलेली भाजी इमारतीपर्यंत पोहोचवण्यासाठी केवळ २२ कर्मचारी काम करतात. टाळेबंदी असल्याने नवीन कर्मचारी कामावर घेणे व्यवस्थापनाला शक्य नसल्याने याच २२ कामगारांवर ताण वाढत आहे. नागरिक भाजीची स्वतंत्र नोंदणी करत असल्याने एक वितरण कोपरी येथे तर दुसरे वितरण गायमुख येथे असते. त्यामुळे कामगारांचा वेळ वाया जात असून नागरिकांना भाजीपाला वेळेवर पोहोचवण्यास विलंब होत आहे. हे वितरण सुरळीत होण्यासाठी इमारतींच्या सर्व सदस्यांची मिळून समूहाने भाजी खरेदी करावी. त्यामुळे वितरण करणे सोपे होईल, असे आवाहन व्यवस्थापनाकडून करण्यात येत आहे.

ऑनलाइन खरेदीची सुविधा

* ठाण्यातील मी मराठी प्रतिष्ठान आणि क्रक्स रिस्क मॅनेजमेंट प्रा.लि. यांच्या माध्यमातून ‘शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला’ यासाठी http://www.mmdcare.in संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.

* ठाणेकरांना हव्या असलेल्या भाज्या आणि फळे यांची ऑनलाइन नोंद या संकेतस्थळावर करता येणार आहे.  मागणी नोंदविल्यापासून पुढील ४८ तासांत त्या इमारतीला भाजी आणि फळे उपलब्ध होणार आहेत.