‘प्रतिभावंत बदलापूरकर’ कार्यक्रमात सचिन जुवाटकर यांचे प्रतिपादन

माझी चित्रे ही आनंदासाठी असून मी केवळ या कलेचे माध्यम आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सचिन जुवाटकर यांनी केले.

‘प्रतिभावंत बदलापूरकर’ या रविवारी सायंकाळी झालेल्या मुलाखतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते. सुप्रसिद्ध वृत्त निवेदक भूषण करंदीकर यांनी त्यांची मुलाखत घेतली.

यावेळी आपल्या कलेच्या प्रवासाबद्दल सांगताना जुवाटकर म्हणाले की, मी जे कोणतेही चित्र काढतो, त्या चित्रातील व्यक्तिरेखेशी मी संवाद साधतो. याचवेळी माझ्याकडून चित्र साकार होते व ते सर्वाना जिवंत वाटते. मात्र मी यात केवळ माध्यम म्हणूनच आपली भूमिका बजावतो. हे सांगून पुढे ते म्हणाले की, संगीतातून मला चित्रांसाठी खरी प्रेरणा मिळते. या भक्तीमय संगीतातून मला दिसलेला देव मी कॅनव्हासवर उतरवतो. या कलेमुळे आजवर अनेक मोठय़ा लोकांना, कलाकारांना अनुभवता आले. या अनोख्या भेटींचे काही किस्से यावेळी त्यांनी उपस्थितांना सांगितले. बदलापूरच्या निसर्गाने माझ्यातल्या कलाकाराला खूप साथ दिली असून शहराच्या आजूबाजूच्या निसर्गरम्य परिसराचे अनेक देखावे मला काढता आले आहेत. तसेच, भविष्यात बदलापुरात आर्ट फोरमची स्थापना करणार असून त्यायोगे नवे चित्रकार घडविण्याचा तसेच चित्रकलेवर कार्यक्रम घेण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखविला. अखेर मुलाखतीची सांगता करताना जुवाटकर यांनी एका भक्तिगीताच्या पाश्र्वसंगीतावर विठ्ठलाचे चित्र रेखाटून केली. संगीतातून उलगडत जाणारा विठ्ठल यावेळी लगेचच त्यांच्या कॅनव्हासवर उलगडत जात असलेला पाहताना प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले आणि जुवाटकर यांना उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन श्रीराम केळकर यांनी केले.