व्यवसायाने वास्तुविशारद असलेल्या सचिन मेन यांनी गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीवर पाणी सोडत पूर्णवेळ पक्षी अभ्यासक म्हणून सुरुवात केली. डॉ. सलीम अली यांचे पुस्तक त्यांच्या वाचनात आले आणि त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली. वयाच्या तिसाव्या वर्षी नोकरी सोडून त्यांनी आपले आयुष्य पक्षी व वन्यजीवांसाठी वाहून घेतले. त्यांनी ‘नेचर अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट सोसायटी ऑफ ठाणे’ या संस्थेची स्थापना केली. ‘पक्षीजगत’ आणि ‘महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने व अभायारण्ये’ ही दोन पुस्तके लिहिली आहेत.

[jwplayer PuSvtqP8]

माझे बालपण पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मध्यमवर्गीय कुटुंबात गेले. ना वाचनाची पाश्र्वभूमी, ना साहित्याचा काही वारसा. शाळेत असतानाही वाचनाचा फार काही संबंध आला नव्हता. महाविद्यालात ‘मृत्युंजय’, ‘शिवाजी’, ‘छावा’ अशी पुस्तके वाचनात आली. ही पुस्तके खूप आवडली. शिक्षण पूर्ण केले आणि आर्किटेक्ट झालो. एमएमआरडीए तसेच एमआयडीसीमध्ये साहाय्यक नगररचनाकार म्हणून रुजू झालो. तरुणपणातच मोठय़ा पदाची नोकरी आणि भरपूर पैसा आल्याने आयुष्य चैनीत जात होते. एकदा कामानिमित्त जात असताना दादरला रस्त्यावर टाइमपास करत फिरत असताना एक पुस्तक दिसले. ते होते वीणा गवाणकर यांचे ‘डॉ. सलीम अली’. पुस्तकाच्या मुखपृष्ठाने आकर्षित केले. त्यामुळे पुस्तक विकत घेतले. प्रवासात एका दमात ते वाचून काढले. या पुस्तकाने मी इतका प्रभावित झालो की मी माझ्या आयुष्याची नवी दिशा ठरवली. मी नोकरी कायमची सोडली. पूर्ण वेळ पक्षीनिरीक्षणासाठी वाहून घ्यायचे ठरवले. एका पुस्तकाने जीवनाचा वेगळा प्रवास सुरू झाला.

वन्यजीव आणि पक्ष्यांवर आधारित पुस्तके वाचायला सुरुवात केली. मारुती चितमपल्ली यांच्या ‘रानवाटा’ या पुस्तकापासून सुरुवात केली. त्यांच्या सर्व पुस्तकांची पारायणे केली आणि पुस्तकांचा संग्रह सुरू झाला. पुस्तकांमध्ये अमर्याद खजिना आहे. तो शोधून काढण्यासाठी वाचनास सुरुवात झाली. माझ्या घरात असंख्य पुस्तके आहेत. त्यात ललित लेखनापासून, संदर्भग्रंथ, आदिवासी संस्कृती, पुराणग्रंथांचाही समावेश आहे. वन्यजीवनावर सुमारे पाचशेहून अधिक पुस्तकांचा समावेश आहे.

वन्यजीव त्यातही पक्षी हा माझा छंद नव्हे तर प्राण बनला. त्यासाठी जगभरातून पुस्तके मिळवून वाचू लागलो. दुर्मीळ पुस्तके अगदी थेट अमेरिका, लंडनहून मागवली आहेत. प्रत्येक पुस्तक ही अमूल्य ठेव असल्याने त्यांना कव्हर घालून, नंबर टाकतो आणि त्याची नोंद ठेवतो. वाचनातून कळत-नकळत संस्कार घडले आणि जीवनशैली बदलली. नुसता पुस्तकांचा संग्रह न करता ती वेळोवेळी वाचणं, आत्मसात करणं, संदर्भासाठी वापरणं मी महत्त्वाचं मानतो. डॉ. बाबा आमटे यांच्या आत्मचरित्राने मन हेलावून गेलं. समाजकार्याची आवड अधिक दृढ झाली.

मारुती चितमपल्ली, व्यंकटेश माडगूळकर, गो. नी. दांडेकर हे माझे आवडते लेखक. माडगूळकरांची ‘सत्तांतर’, ‘नागझिरा’, ‘बनगरवाडी’, दांडेकरांची ‘माचीवरला बुधा’, ‘पडघवली’, ‘पवनकाठचा धोंडी’ ही पुस्तके आजही आवडीने वाचतो. पुराणग्रंथात ‘गाथा सप्तदशी’ (जोगळेकर संपादित), कबीर दोहावली (बिजेंद्र कुमार) ही आवडती पुस्तके. इंग्रजी चेकॉव्ह, टॉलस्टॉय हे आवडते लेखक. आदिवासी संस्कृती व ग्रामीण जीवनावर आधारित पुस्तके आवडीने वाचली. मधुकर वाकोडे यांचे ‘झेलझपाट’, ‘शिलीपशेरा’ ही पुस्तके भावली. ना. धों. महानोर, बहिणाबाईंची गाणी मनात कायमची घर करून राहिली. वन्यजीवनावर अधिक वाचन केले आहे. जॉर्ज शेल्लर यांचे ‘दि डिअर अ‍ॅण्ड टायगर’, पीटर स्कॉट यांचे ‘ट्रॅव्हल डायरीज ऑफ अ नेचरिस्ट’, स्टुअर्ट बेकर यांचे ‘द आयडिफिकेशन ऑफ बर्ड’, डय़ुम व मार्शल यांचे ‘द गेम बर्ड ऑफ इंडिया’ ही आवडती पुस्तके आहेत. सध्या मारुती चितमपल्ली यांची पुस्तके पुन्हा वाचतोय. वन्यजीवनावर त्यांच्याइतके सुंदर क्वचितच कुणी लिहिले असेल.

मारुती चितमपल्ली यांच्याशी मैत्री झाल्यानंतर त्यांच्या संग्रही असलेली सर्व पुस्तके मिळवली. संस्कृत साहित्यात व पुराणग्रंथात वन्यजीवनावरचे अनेक संदर्भ सापडतात, त्यामुळे संस्कृत शिकतोय. पुण्यातील अप्पा बळवंत चौक, फोर्ट येथील पदपथावरील पुस्तकांच्या दुकानांतून पुस्तके विकत घेतो. मुंबईच्या सुंदरबाई सभागृहात पुस्तकांचे प्रदर्शन लागले की भरपूर पुस्तके विकत घेत असतो. वाचनामुळे लिखाणात प्रगल्भता आणि समज येते.

पहिल्यांदा पुस्तक आवडले म्हणून वाचतो. दुसऱ्यांदा ते आत्मसात करण्यासाठी आणि तिसऱ्यांदा संदर्भ म्हणून ते वाचत असतो. पुस्तकांमुळे माझी पक्षीअभ्यासक म्हणून ख्याती होतेय. पुस्तकांनी मला घडवले, संस्कार दिले. पुस्तके वाचताना मला जंगलात फिरल्याची अनुभूती येते.

शब्दांकन- सुहास बिऱ्हाडे

[jwplayer PuSvtqP8]