कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे प्रतिपादन

शेतात धान्य पिकवणे इतकेच शेतकऱ्याला माहीत होते. मात्र धान्य महोत्सवामुळे शेतकऱ्यांना स्वत:चा माल विकण्याचे कौशल्य साध्य झाले असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी आत्महत्येपासून स्वत:ला परावृत्त करत अशा धान्य महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी ठाण्यात व्यक्त केले. भाजीपाला नियमनमुक्ती झाल्यानंतर आता कडधान्य नियमनमुक्तीसाठी शासन प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

संस्कार प्रतिष्ठान आणि नाम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गावदेवी मैदानात आयोजित धान्य महोत्सव आणि कोकण विकास प्रतिष्ठानतर्फे आयोजित आंबा महोत्सवाचे उद्घाटन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते सोमवारी झाले. या कार्यक्रमात नाम फाऊंडेशनचे मकरंद अनासपुरे, आमदार संजय केळकर, जिल्हा कृषी अधीक्षक महावीर जंगटे, जिल्हा कृषी अधिकारी प्रफुल्ल बनसोडे तसेच कृषी, सहकार व पणन विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

फळे बाजार नियमनमुक्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर पहिला शेतबाजार महोत्सव ठाणे शहरात सुरू करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ आता धान्यांच्या थेट विक्रीचा उपक्रम ठाण्यात सुरू झाला असून हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार आहे, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. शेतकऱ्यांचा माल थेट खरेदी करण्यासाठी शहरातील नागरिक तयार असतात. शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी हा महोत्सव फायदेशीर आहे. ठाण्यातील धान्य महोत्सव यशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र असा महोत्सव आयोजित करणार असल्याचे नाम फाऊंडेशनचे मकरंद अनासपुरे यांनी सांगितले.

धान्य महोत्सवात ठाणेकरांची गर्दी

ठाण्यातील धान्य महोत्सवात बीड, उस्मानाबाद, जळगाव जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय धान्य उत्पादने माफक दरात विक्रीसाठी ठेवली आहेत. उद्घाटनापूर्वीच धान्य खरेदी करण्यासाठी ठाणेकरांची गर्दी महोत्सवात पाहायला मिळाली. कोकण विकास प्रतिष्ठानतर्फे गावदेवी मैदानात दरवर्षी आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवात नागरिकांना देवगड, रत्नागिरी, पावस, राजापूर, सिंधुदुर्ग येथील आंबे, आंब्याची उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. या महोत्सवासोबतच ‘एक पाऊल बळीराजासाठी’ ही चळवळ नव्याने उभारण्यात येत असून यामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, चवळी, तूरडाळ अशी अनेक धान्ये थेट शेतकऱ्यांकडून ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. हा धान्य महोत्सव ४ मे पर्यंत गावदेवी मैदानात सुरू राहणार असून ६ मे ते १० मे या कालावधीत पातलीपाडा येथील माझी आई शाळेत भरणार आहे. पातलीपाडा भागात शेतकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था नाम फाऊंडेशनतर्फे करण्यात आली असून पातलीपाडय़ापासून ते गावदेवीपर्यंत त्यांच्या वाहतुकीची व्यवस्था नाम फाऊंडेशनने केली आहे.