20 January 2019

News Flash

सुरक्षेच्या उपाययोजनांचे तीनतेरा

वसई तालुक्यात या महामार्गाची हद्द सकवार ते पुढे वर्सोवा पुलापर्यंत आहे. गु

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातांत वाढ; वर्षभरात २८ बळी

वसई शहरातून जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. वर्षभरात या मार्गावर २८ जणांचे बळी घेतले आहे. वाहनचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ज्या उपाययोजना करायच्या असतात, त्या न केल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या महामार्गावर चांगल्या रुग्णालयाचा अभाव आहे. सेवा रस्ता, आपत्कालीन मदतीसाठी दूरध्वनी, प्रथमोपार केंद्रे यांची कोणतीही सोय नाही. अतिक्रमणे, नाले बुजवल्याने साचणारे पाणी महामार्गावर येत आहे. यामुळे अपघातात वाढ होत असल्याचे आढळून आले आहे.

वसई तालुक्यात या महामार्गाची हद्द सकवार ते पुढे वर्सोवा पुलापर्यंत आहे. गुजरात तसेच मुंबईला जोडणारा हा महामार्ग असल्याने या ठिकाणी अवजड वाहनांबरोबरच प्रवासी तसेच इतर लहान-मोठय़ा वाहनांची संख्या मोठी आहे. २०१७ या वर्षांत या महामार्गावर एकूण १५२ अपघातांच्या घटना घडल्या आहेत. या अपघातांत २८ जणांचा मृत्यू झाला, तर १६७ जण जखमी झाले आहे. महामार्ग प्राधिकरणाकडून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुरेसी काळजी घेतली जात नसल्याचा आरोप येथील स्थानिक रहिवाशांनी केला आहे. वाहनचालक निमयांचे उल्लंघन करून भरधाव वाहने चालवत असल्याने अपघात घडत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, मात्र महामार्ग प्राधिकरणाकडून वाहनचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी करावयाच्या आवश्यक सोयीसुविधा करण्यात आलेल्या नाहीत.

सुविधांचा अभाव

  • महामार्गावर सुसज्ज रुग्णालय नाही. त्यामुळे जखमींना अपघातानंतर ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळत नसल्यानेही बळींची संख्या वाढत आहे.
  • या महामार्गावर गेल्या काही वर्षांत अनेक उड्डाणपुलांचे निर्माण झाले असले तरी महामार्गासाठी लागणारे निकष पूर्ण झालेले नाही.
  • महामार्गावर आपत्कालीन घटनेसाठी दूरध्वनी केंद्र असावे लागतात. अपघातादरम्यान नागरिकांना या दूरध्वनीचा उपयोग होऊन तात्काळ मदत मिळू शकते. परंतु या महामार्गावर काही ठिकाणी फक्त नावापुरतेच दूरध्वनी केंद्र उभे केले आहे. ते आजही बंद आहेत.
  • प्रत्येक महामार्गावर सेवा रस्ता (सव्‍‌र्हिस रोड) असणे आवश्यक असते. सेवा रस्त्यामुळे डाव्या बाजूने वाहनांना विरुद्ध दिशेने गाडी चालवण्यात मदत होत असते, परंतु सेवा रस्ता नसल्यामुळे डाव्या बाजूने विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाडय़ांची गैरसोय होऊन अपघातांच्या घटना घडत असतात.
  • या महामार्गावरील वसई-विरार येथील वळणावरील उड्डानपुलाखाली फेरीवाल्यांनी मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण केले आहे. ते धोकादायक ठरत आहे.
  • अनेक ठिकाणी अनधिकृत पार्किंग केल्यामुळे अनेक ट्रक येथे उभे असतात, ज्यामुळे अपघातात वाढ होण्याची शक्यता निर्माण होत असते.
  • पावसाळ्यात तर पाणी वाहून जाण्यासाठी काहीच उपाय योजना केलेल्या नाहीत. त्यामुळे महामार्गावर पाणी साचून वाहतूक कोंडी होत असते.
  • एखाद्या वाहनात बिघाड झाल्यावर दुरुस्तीकरता वा विश्रांतीकरता ठिकठिकाणी ‘ट्रक बे’ असावे लागतात. परंतु या महामार्गावर एकही ‘ट्रक बे’ बनवण्यात आलेला नाही. परिणामी  वाहनचालकांना विश्रांती मिळत नाही.
  • घोडबंदर रोडकडे वळणाऱ्या महामार्गावर तर वाहन चालवणे अगदी कठीण झाले आहे, वर्सोवा पूल दुरुस्त होऊन अनेक महिने उलटले असले तरी तिथे मुंबईकडून येणाऱ्या गाडय़ांची मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. शनिवार-रविवारी तर तास दोन तास या मार्गावर वाहतूक कोंडी होत असल्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत असते.

महामार्ग प्राधिकरणाचा हा अक्षम्य हलगर्जीपणा आहे. जर प्राथमिक सुविधा उपलब्ध केल्या तर जखमींना मदत मिळेल. सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना केल्या, तर अपघात कमी होतील.

सुशांत पाटील, अध्यक्ष भूमिपुत्र रोजगार हक्क समिती.

First Published on January 11, 2018 2:22 am

Web Title: safety issue in mumbai ahmedabad highway