साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत नेहमीप्रमाणे राजकारण

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जवळच्या उमेदवाराच्या वि‘जया’चा ‘प्रकाश’ पडावा, यासाठी डोंबिवली संमेलनाचे आयोजन करणाऱ्या ‘आगरी युथ फोरम’ने जोरदार व्यूहरचना आखल्याचे समजते. प्रत्येक निवडणुकीत संमेलन आयोजक संस्थेच्या वाटय़ाला येणाऱ्या ८५ मतांच्या एकगठ्ठा बेगमीचा या उमेदवाराच्या विजयात उपयोग व्हावा, याकरिता आयोजकांचे प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे, त्यासाठी या ८५ मतदारांच्या यादीत डोंबिवलीतील साहित्यिक मंडळींऐवजी आगरी समाजाच्या प्रतिनिधींची वर्णी लावण्यात आल्याची चर्चा आहे.

डोंबिवलीत येत्या फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या ९० व्या मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजक संस्थेला ८५ मते देण्याचा अधिकार आहे. त्यानुसार त्यांनी यादी जाहीर केली आहे. मात्र या यादीत ५५ मतदार हे आगरी समाजाचे असून यात भाजपचे नगरसेवक तथा संघर्ष समितीचे कार्यकर्ते डॉ. सुनीता पाटील, अर्जुन चौधरी, चंद्रकांत पाटील, गंगाराम शेलार, जालिंदर पाटील, यांसोबतच हर्षद पाटील, नंदू म्हात्रे, दीपेश म्हात्रे, राजू पाटील आदी राजकारण्यांचा समावेश आहे. आगरी युथ फोरमच्या १७ पदाधिकाऱ्यांसोबतच साहित्याशी निगडित केवळ १३ जणांचा यादीत समावेश आहे. त्यातही मोठमोठय़ा साहित्यिकांना मात्र डावलण्यात आले असून आयोजन समितीवर ते नाराज असल्याचे दिसते.

आगरी समाजातील प्रतिनिधींना मतदानाचा अधिकार मिळवून देण्यामागे आपल्या जवळचा उमेदवार निवडून यावा, अशी आयोजन समितीची भूमिका असल्याचे समजते. साहित्य संमेलनाध्यक्षाच्या निवडणुकीतील मतदारांची संख्या सुमारे १२०० आहे. अशा वेळी आयोजन समितीने वर्णी लावलेल्या ८५ मतदारांची एकगठ्ठा मते उमेदवाराला फायदेशीर ठरू शकतील, असे सांगितले जात आहे. त्यामुळे निवडणुकीत रंगत येणार आहे.

कोणालाही झुकते माप नाही

‘मतदार यादीमध्ये कोणाचे नाव टाकावे किंवा नाही याचे सर्व अधिकार आयोजन समितीला महामंडळाने दिले आहेत. संघर्ष समिती तसेच आगरी युथ फोरममधील सदस्यांनी आम्हाला मदत केली असून त्यांना आम्ही योग्य तो मान दिला आहे. त्यांच्यासोबतच इतर सर्व क्षेत्रांतील लोकांचाही यात समावेश आहे. राजकीय क्षेत्रातील केवळ दोन नगरसेवकांचा यात समावेश आहे. नियमानुसार निवडणूक होणार आहे. त्यात संयोजन समितीतर्फे कुणालाही झुकते माप देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,’ असे आयोजन संस्था आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी सांगितले.