विविध कामांसाठीच्या समित्यांचीही नेमणूक नाही; साहित्य संमेलन सुरळीत पार पडण्याबाबत रसिकांना चिंता

येत्या फेब्रुवारी महिन्यात भरणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दणक्यात आणि वेगळय़ा पद्धतीने करण्याचा दावा या संमेलनाचे आयोजक असलेल्या आगरी युथ फोरमतर्फे करण्यात येत असला तरी, सुमारे दीड महिन्यांवर येऊन ठेपलेल्या या संमेलनाच्या तयारीचा काहीच पत्ता लागत नाही. संमेलनपूर्व कामांच्या नियोजनासाठी आतापर्यंत एकाही समितीची नेमणूक करण्यात आलेली नसल्याने संमेलन सुरळीत पार पडणार का, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आगरी महोत्सवानंतर संमेलनाच्या तयारीला वेग येईल, असे सांगितले जात होते. परंतु, हा महोत्सव संपून एक आठवडा लोटल्यानंतरही संमेलनाचे गाडे जागीच आहे.

संमेलनाच्या ठिकाणी योग्य नियोजन व्हावे यासाठी आगरी युथ फोरम विविध समित्यांची नेमणूक करणार असल्याचे १७ नोव्हेंबरला एका बैठकीदरम्यान सांगण्यात आले होते. निवास व्यवस्था, स्वागत समिती, भोजन व्यवस्था, बैठक व्यवस्था, स्टेज व्यवस्था यांसारख्या अनेक समित्या त्यात असणार आहेत. यात सहभागी होण्यासाठी नागरिकांनाही आवाहन करण्यात आले होते. मात्र अद्याप ना समिती ठरली ना कुणी नागरिकांनी प्रतिसाद दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

साहित्य संमेलनासाठी येणाऱ्या साहित्यिकांची व्यवस्था हॉटेलमध्ये न करता डोंबिवलीकर रसिकांनी आपापल्या घरी करावी, असे आवाहन समितीने केले आहे. त्यासाठी अद्याप कुणीही स्थानिक नागरिकांनी आपले नाव नोंदविलेले नाही. नागरिकांनी नाव नोंदविल्यानंतर त्या घरांची पाहणी करणे, परिसर पाहणे आदी पुढील कामे आहेत. त्यासाठीही एक समिती नेमली जाणार असल्याचे आयोजन समितीने सांगितले होते.

साहित्य संमेलनाच्या प्रचारासाठी सध्या आगरी युथ फोरमचे प्रयत्न सुरू आहेत. महाविद्यालयांत बैठका घेणे, साहित्यपूर्व संमेलनांची आखणी करणे आदी कामे केली जात असली तरी समित्यांची आखणीही होणे गरजेचे आहे. आगरी युथ फोरमकडे मनुष्यबळ पुरेसे असले तरी या कामी शहरातील इतर संस्थांची मदत घेणे आवश्यक असताना अद्याप कोणालाही याविषयी विचारणा केली नसल्याचे शहरातील मोठय़ा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

आयोजन समिती आगरी युथ फोरम ही आगरी महोत्सवात व्यस्त असल्याने त्यांना साहित्य संमेलनांकडे पुरेसा वेळ देता आला नसल्याचे संमेलनाचे पदाधिकारी सांगत होते. मात्र साहित्य संमेलनाविषयीची पहिली बैठक होऊन दोन महिने उलटले आहेत. अद्याप काहीही ठरलेले नाही. ‘आगरी महोत्सवाच्या काळात इतर नागरिकांकडे संमलेनाविषयीच्या काही जबाबदाऱ्या सोपविता येऊन काम सुरू ठेवता आले असते. मात्र समितीची नेमकी काय भूमिका आहे हेही अद्याप आम्हाला स्पष्ट होत नाही. केवळ बैठका घेतल्या जात असून त्यातून पुढे काहीही साध्य होताना दिसत नाही,’ अशी खंत डोंबिवलीतील एका साहित्यरसिकाने व्यक्त केली.

साहित्य संमेलनाच्या कामकाजाला वेग देण्यासाठी तसेच काही गोष्टींचे नियोजन करण्यासाठी नागपूर येथे आलो आहे. लवकरच संमेलनासाठी आवश्यक असणाऱ्या समित्या नेमण्यात येणार आहेत. साधारण ४० ते ५० च्यावर समित्या नेमाव्या लागतील. आगरी महोत्सवात काही दिवस व्यस्त असलो तरी साहित्य संमेलनाचे कामही सुरू आहे.  कल्याण-डोंबिवली शहरात कामानिमित्त लवकरच काही बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे.

गुलाब वझे, अध्यक्ष तथा स्वागताध्यक्ष, आगरी युथ फोरम