वाहतूक व्यवस्था पूर्ववत; वाहनचालक, प्रवाशांना दिलासा
ठाणे येथील साकेत भागात मुंबई-नाशिक महामार्गावर असलेल्या खाडीपुलावरील मुंबई-नाशिक मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम रविवारी सकाळी पूर्ण झाले. त्यानंतर ही मार्गिका वाहतुकीसाठी पूर्णपणे खुली करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला. त्याचबरोबर गेल्या पंधरा दिवसांपासून पुलाच्या कामासाठी वाहतूक मार्गात लागू करण्यात आलेले बदल रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था आता पूर्ववत करण्यात आली आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावर साकेत परिसरात असलेला खाडीपूल नादुरुस्त झाल्यामुळे तो वाहतुकीसाठी धोकादायक बनला होता. या पाश्र्वभूमीवर ८० टक्के नादुरुस्त असलेल्या नाशिक-मुंबई मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतले होते. या कामासाठी शहरातील वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आल्यामुळे सुरुवातीचे दोन दिवस ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर शहरातील वाहतूक व्यवस्था रुळावर आणण्यात वाहतूक पोलिसांना यश आले होते. या मार्गिकेच्या दुरुस्तीसाठी पंधरा दिवसांचा अवधी लागणार होता, मात्र सात दिवसातच दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. त्यानंतर ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. त्यापाठोपाठ ६० टक्के नादुरुस्त असलेल्या मुंबई-नाशिक मार्गिकेचे काम हाती घेण्यात आले. त्यासाठी पंधरा दिवसांचा अवधी लागणार असल्यामुळे वाहतूक मार्गातील बदल कायम ठेवण्यात आले होते. या मार्गिकेचेही रविवारी सकाळी म्हणजेच सात दिवसात काम पूर्ण झाले असून त्यानंतर ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. दरम्यान, साकेत खाडीपुलावरील दोन्ही मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून दोन्ही मार्गिकेवरून वाहतूकही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पुलाच्या कामासाठी शहरात लागू करण्यात आलेले वाहतूक बदल रविवारपासून रद्द करण्यात आले असून शहरातील वाहतूक व्यवस्था पूवर्वत करण्यात आली आहे.