काकडी ५०रुपये, तर टोमॅटो ६० रुपये किलो
भाजीपाल्याची आवक घटल्याने सर्वसामान्यांना महागाईचे चटके बसू लागले असतानाच जेवणाला चव आणणारी कोशिंबीरही आता परवडेनाशी झाली आहे. घाऊक बाजारात काकडी, टॉमेटोचे दर वाढताच किरकोळीत ते किलोमागे ६० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. वर्षभर भाज्यांच्या दरात सातत्याने चढउतार होत असले तरी काकडीचे दर सातत्याने स्थिर होते. यंदा प्रथमच काकडी महाग झाली आहे.
उन्हाळ्या वाढत्या झळांमुळे राज्यभर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने काकडीच्या पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे, अशी माहिती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्यामाकांत चौधरी यांनी दिली. त्यामुळे गेल्या पंधरवडय़ापासून काकडीचे दर वाढू लागले आहेत, असे त्यांनी सांगितले. टोमॅटोचे दर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढू लागले आहेत. निव्वळ आवक घटल्यामुळेच भाज्यांचे दरांचा उच्चांक वाढू लागला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या भाजीपाला बाजारात दर दिवशी १० ते १२ टन एवढी काकडीची आवक होत असते. ती आता ६ ते ७ टनापर्यंत खाली घसरली आहे. दिवसाला २० ते २५ टन एवढी टोमॅटोची आवक होत असे. आता हा आकडा १५ ते १६ टनपर्यंत खाली घसरला आहे. पाऊस लांबल्यामुळे भाज्यांची ही आवक घटली आहे. त्याचा परिणाम भाज्यांचे दर वाढीवर मोठय़ा प्रमाणात होऊ लागला आहे. असे असले तरी टोमॅटो आणि काकडीच्या दरात झालेली वाढ आश्चर्यजनक आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.