उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना २ कोटी २४ लाखांचा महसूल

ठाणे : करोना विषाणू संकटामुळे गेल्या सात महिन्यांपासून मंदावलेल्या वाहन विक्रीच्या व्यवसायाला दसऱ्याच्या निमित्ताने पुन्हा तेजी आली आहे. ठाणे जिल्ह्यात दसऱ्याच्या मुहूर्तावर १ हजार ८४ वाहनांची विक्री झाली. यामध्ये दुचाकी विक्रीचे प्रमाण सर्वाधिक आहे. या वाहनांच्या विक्रीमुळे ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई या तीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना तब्बल २ कोटी २४ लाखांचा महसूल मिळाला आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तावर दरवर्षी वाहनांची मोठय़ा प्रमाणात विक्री होत असते. यंदा करोनाचे संकट असल्यामुळे मार्च महिन्यापासून टाळेबंदी लागू करण्यात आली होती. सुरुवातीचे अडीच महिने राज्यात कडक टाळेबंदी असल्यामुळे गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया या दोन्ही मुहूर्तावर वाहनांची विक्री ठप्पच होती. याचा मोठा फटका विक्रेत्यांना बसला होता. विक्री बंद असल्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागालाही महसुलाला मुकावे लागले होते. गेल्या काही दिवसांपासून टाळेबंदीत काहीशी शिथिलता आली असून आता सर्व व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहेत. गेल्या सात महिन्यांपासून मंदावलेल्या वाहन विक्रीला दसऱ्याच्या मुहूर्तावर पुन्हा तेजी आल्याचे पाहायला मिळाले. जिल्ह्यात दसऱ्याच्या पूर्वसंध्येला शनिवारी आणि मुहूर्तावर रविवारी एकूण १ हजार ८४ वाहनांची विक्री झाली आहे.  त्यात ८२६ दुचाकी, २५६ चारचाकी वाहने आणि दोन वाहतूक वाहनांचा समावेश आहे. ठाणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय क्षेत्रातून सर्वाधिक ७३३ वाहनांची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तावर विक्री झालेली वाहने

उपप्रादेशिक परिवहन     वाहने         महसूल

कार्यालय

ठाणे                                ७३३            १ कोटी ३९ लाख ७३ हजार ६८४

कल्याण                        २४९               ५२ लाख ७७ हजार ९७

नवी मुंबई                       १०२              ३१ लाख ६८ हजार ७२६

एकूण                          १०८४              २ कोटी २४ लाख १९ हजार ५०७

टाळेबंदी शिथिलीकरणानंतर नागरिकांची मानसिकता बदलत असून दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहनांच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे. ही एक सकारात्मक बाब असून वाहनांच्या विक्रीमुळे जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना चांगला महसूल मिळाला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर वाहन नोंदणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

– रवी गायकवाड, प्रादेशिक परिवहन विभागप्रमुख, ठाणे