२०० दुचाकी, ५० चारचाकी वाहनांचा समावेश; उपप्रादेशिक परिवहन खात्याला एका दिवसात सव्वा कोटींचा महसूल

दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन वस्तू, सोन्याचे दागिने आणि वाहने खरेदी केली जातात. वसईच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून एकाच दिवसात तब्बल ३०२ वाहनांची विक्री झाली आहे. या वाहनांच्या विक्रीतील करापोटी उपप्रादेशिक परिवहन विभागाला दीड कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

गुढीपाडवा आणि दसऱ्याला मोठय़ा प्रमाणावर वाहनखरेदी केली जात असते. दसऱ्याच्या दिवशी वाहनांच्या खरेदीसाठी वसईतील वाहनविक्रीची दुकाने सज्ज होती. विरारच्या चंदनसार येथील उपप्रादेशिक कार्यालयात सुट्टीच्या दिवशी नागरिकांनी नव्या वाहनांची नोंदणी करण्यासाठी गर्दी केली होती. दसऱ्याच्या मुहूर्तावर तब्बल ३०२ नव्या वाहनांची नोंदणी करण्यात आली. त्यात सर्वाधिक म्हणजे २०० दुचाकी होत्या. यामुळे उपप्रादेशिक परिवहन खात्याला १ कोटी २९ लाख ९२ हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे.

अनेक नागरिकांनी दसऱ्याच्या दिवशी दुकानातून वाहने विकत घेतली. मात्र त्यांची नोंदणी केली नाही. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी वाहनखरेदीची संख्या अधिक असते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. २०११ पासून विरार पूर्वेच्या चंदनसार येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात आले. वसईसह पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांचा कारभार या केंद्रातून चालवला जातो. पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील वाहनांची नोंदणी या उपप्रादेशिक कार्यालयातून होत असते. या कार्यालयात पाच लाखांहून अधिक वाहनांची नोंद आहे. वाहन विक्रीची संख्या वाढत असून उपप्रादेशिक खात्याच्या महसुलातही वाढ होत आहे. मागील आर्थिक वर्षांत उपप्रादेशिक विभागाला वाहन नोंदणीतून २११ कोटींचा महसूल मिळाला होता.

वाहनांची विक्री

  • एकूण वाहनांची नोंदणी : ३०२
  • दुचाकी : २००
  • चारचाकी : ५०
  • रिक्षा, मालवाहू वाहने : ५२
  • महसूल गोळा : १ कोटी २९ लाख रुपये

दसऱ्याच्या दिवशी मोठय़ा प्रमाणात वाहनांची विक्री होत असते. हे लक्षात घेऊन आरटीओने गुरुवारी कार्यालय सुरू ठेवले होते. अनेक ग्राहकांनी आदल्या दिवशी वाहनांची नोंदणी केली होती. कराची रक्कम ऑनलाइन भरण्यात आली.    – अनिल पाटील, अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन विभाग