नशा चढवणाऱ्या कागदाची मुंबई-ठाण्यात सर्रास विक्री; किशोरवयीन मुलांमध्ये वाढते आकर्षण

मुलाच्या हातात प्राणी-पक्ष्यांच्या चित्रांचे रंगीत पेपर दिसत असेल, तर पालकांनो, सावधान! कारण अशाच रंगीबेरंगी चित्रांच्या वेष्टनातून एलएसडी नावाच्या अमली पदार्थाची जोरदार विक्री सध्या मुंबई, ठाण्यात होऊ लागली आहे. ठाणे पोलिसांनी नुकत्याच केलेल्या एका कारवाईतून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठाण्यातील वर्तकनगर येथील एका उच्चभ्रू संकुलात राहणाऱ्या हितेन मल्होत्रा (२३) आणि त्याला एलएसडी पेपर पुरविणाऱ्या क्लिंटन स्वामी (३७) याला मुंबईतील गोरेगाव येथून नुकतीच अटक करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांनी अनेक तरुण, किशोरवयीनांना एलएसडी विकल्याचे उघड झाले आहे.

वर्तकनगर येथील कॅडबरी जंक्शन परिसरात ६ जून रोजी रात्री अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार हे त्यांच्या पथकासह गस्त घालत होते. या दरम्यान, हितेन हा तेथे संशयास्पद पद्धतीने फिरत असल्याचे पोलिसांना दिसले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून १ लाख २५ हजार ३०० रुपयांचा एलएसडी पेपर नावाचा अमली पदार्थ आढळून आला. यानंतर त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता तेथून १३ एलएसडी पेपर जप्त करण्यात आले. त्याची बाजारात २ लाख ६० हजार रुपये इतकी किंमत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हितेन हा वर्तकनगर येथील उच्चभ्रू इमारतीत राहतो. या अमली पदार्थाबाबत त्याच्या कुटुंबीयांना माहिती नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हितेनविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हितेनला हे एलएसडी पेपर पुरवणारा क्लिंटन स्वामी यालाही पोलिसांनी मुंबईतील गोरेगाव येथून अटक केली आहे. क्लिंटनविरोधात २०१२ ला गोव्यामध्ये अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी एक गुन्हा दाखल होता. त्यानंतर शिक्षा भोगून तो मुंबईत आला होता. मात्र, त्यानंतर त्याने अमली पदार्थाची तस्करी सुरू ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गोवा कनेक्शन

हे एलएसडी पेपर विदेशात मिळतात. मात्र अनेक विदेशी पर्यटक हे गोवा येथे छुप्या पद्धतीने अमली पदार्थ विक्रीसाठी येतात. क्लिंटन हे एलएसडी पेपर गोवा येथूनच आणत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. दोन वर्षांपासून मुंबई-ठाण्यात एलएसडी पेपरची विक्री हितेन आणि क्लिंटन करत होते. हितेन हा पदवीधर असून तो नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथे एका कंपनीत कामाला आहे. तर क्लिंटन हादेखील १२ वी शिकलेला आहे.

एलएसडी काय?

‘एलएसडी’ हा एक छोटासा कागदी तुकडा असतो. त्यावर पक्षी-प्राण्यांची चित्रे असतात. या कागदावर ‘लेसरजीक अ‍ॅसिड डा एथिल अमाईड’ हे अमली द्रव शिंपडण्यात येते. त्यानंतर या पेपरवरील दोन ते तीन इंच कागदी तुकडादेखील ५ हजार रुपयांना विकला जातो. या कागदाच्या खरेदीसाठी नशेबाज सुपरमॅन, बॅटमॅनसारखे परवलीचे शब्द वापरतात. या कागदाला जिभेवर ठेवल्यानंतर तब्बल १० ते १२ तासांची झिंग मिळते, असे पोलिसांनी सांगितले.