15 July 2020

News Flash

करोनाकाळात वडाच्या कत्तलीस चाप

बाजारपेठा बंद असल्याने वाण विक्रीस आळा

बाजारपेठा बंद असल्याने वाण विक्रीस आळा

पूर्वा साडविलकर/ रोशनी खोत, लोकसत्ता

ठाणे : वटपौर्णिमेला पूजेसाठी वडाची तोड करू नका, असे आवाहन पर्यावरण संस्थांनी करूनही काही केले जात नाही. मात्र, यंदा करोनाकाळात जिल्ह्य़ात सर्वत्र बाजारपेठा बंद असल्याने वडाच्या फांद्याच्या विक्रीलाही आळा बसला. दरम्यान, अंबरनाथ आणि बदलापूरमधील बाजारपेठांत या फांद्यांची विक्री सुरू होती.

पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा आहे. मात्र, आधुनिक काळात महिलांना घराबाहेर पडून वडाच्या झाडाची पूजा करणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक जण वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची फांदी आणून घरातच पूजा करतात.

या प्रकारामुळे दरवर्षी वडाच्या झाडांच्या फांद्या मोठय़ा प्रमाणात तोडल्या जातात. ही वृक्षतोड होऊ नये म्हणून पर्यावरण संस्थांकडून नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते. त्याकडे दुर्लक्ष करून अनेक जण फांद्या विकत घेतात आणि घरात ते पुजले जाते.

वटपौर्णिमेच्या एक ते दोन दिवस आधीपासूनच बाजारात आणि शहरातील रस्त्यांवर अनेकजण वडांच्या फांद्यांसह पूजेचे साहित्य विक्री केली जात होती. ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांसह ग्रामीण भागात हे चित्र असायचे. करोनाकाळात फांद्यांची विक्री झाली नाही. यंदा करोनामुळे ग्राहक आपल्याकडे पूजेचे सामान खरेदी करण्यासाठी येतील की नाही, असा प्रश्न विक्रेत्यांसमोर होता.

वडाच्या चित्राची पूजा

टाळेबंदीत पूजेत खंड पडू नये म्हणून वडाच्या झाडाचे चित्र काढून त्याची पूजा करणार असल्याचे ठाण्यातील डवलेनगर परिसरातील सुप्रिया शेवाळे यांनी सांगितले. तर, डोंबिवलीतील वृषाली माने यांनी केवळ उपवास करूनच घरच्या देवाची पूजा करणार असल्याचे सांगितले. तसेच डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी परिसरातील महिलांना वडाच्या झाडाचे रोप दिले आहे. यापुढेही वडाच्या झाडाच्या फांद्या न तोडता या रोपाची पूजा करावी, असा संदेश त्यांनी यातून दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2020 4:15 am

Web Title: sale of banyan tree branches hit in corona period
Next Stories
1 जागतिक पर्यावरणदिनी पालिका वृक्ष प्राधिकरण संपर्काबाहेर 
2 ठाण्यात वादळ‘वाट’
3 वादळानंतर जिल्ह्य़ात पावसाची रिपरिप
Just Now!
X